मुंबई: राज्यातील ऑनर किलिंगच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी एका तरुणीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या मुलीचे नाव प्रियंका शेटे असून ती १९ वर्षांची आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रियंकाचे एका तरुणाशी प्रेमसंबंध आहेत. ही गोष्ट तिच्या घरच्यांना कळाल्यानंतर त्यांनी प्रियंकाला मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. यानंतर प्रियंकाने घरातून पळ काढला आणि पोलिसांकडे मदत मागितली. मात्र, पोलिसांनी या तक्रारीची दखल न घेतल्याने प्रियंकाने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने याचिकेची दखल घेतली असून तळेगाव पोलिसांना मुलीची रितसर तक्रार नोंदवून घेण्याचे आदेश दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियंका पुण्यातील तळेगावनजीक नवलाख उंबरे या गावात राहते. तिच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंकाचे तिच्या महाविद्यालयात असणाऱ्या एका तरुणावर प्रेम आहे. मात्र, हा तरूण अनुसूचित जातीचा असल्याने घरच्यांचा या नात्याला विरोध आहे. लग्न केल्यास नातेवाईकांकडून आपल्या व प्रियकराच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही प्रियंकाने केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करत पोलिसांना तसे निर्देशही दिले आहेत. 




काही दिवसांपूर्वीच अहमदनगरमधील ऑनर किलिंगच्या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली होती. येथील पारनेर तालुक्यातील निघोज येथे एका मुलीने आंतरजातीय विवाह केला. या रागातून मुलीच्या काका आणि मामाने दोघांना पेट्रोल टाकून जाळले. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला असून मुलावर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.