चाळवाला नवरा नको रे बाबा, मुंबईतल्या मुली असं का म्हणतात?
चाळीत राहणाऱ्या मुलांसमोर आता एक गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
ऋचा वझे, झी मीडिया, मुंबई : मुंबईतल्या चाळींमध्ये पिढ्यानपिढ्या राहणाऱ्यांना एका वेगळ्याच समस्येला तोंड द्यावं लागत आहे. ही समस्या म्हणजे तिथल्या मुलांची लग्नच ठरत नाहीयेत. कारण आहे ते म्हणजे सार्वजनिक शौचालयं.
मुंबईतील शहराची ओळख सांगायची तर मुंबईतल्या चाळी हे त्यापैकीच एक. गिरगाव, परळ इथे अजूनही चाळ संस्कृती जपली जातेय. मात्र या चाळीत राहणाऱ्या मुलांसमोर आता एक गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. कारण, चाळीत असणाऱ्या सार्वजनिक शौचालयांमुळे या मुलांना लग्नासाठी थेट नकारच मिळतोय.
सार्वजनिक शौचालय नको असाच त्यांचा हट्ट
गिरगावातील 145 वर्षे जुन्या कामत चाळीमध्ये राहणाऱ्या 76 वर्षीय मुरलीधर सावंत यांच्या 38 वर्षीय मोठ्या मुलाचं लग्न होत नसल्याची कैफियत त्यांनी मांडलीये. घरात शौचालय नाही म्हणून अनेक मुली नकार देत असल्याचं त्यांनी म्हटलंय. मुलाला चांगली नोकरी आहे पगार आहे मात्र या एकमेव कारणासाठी लग्न जमत नाही. अनेकांना तर नाईलाजाने मुंबईबाहेर घर घेऊन राहावं लागण्याची वेळ आलीये.
घरात शौचालय बांधण्यासाठी पालिकेकडून तर, परवानगी आहे मात्र अनेक घरमालक परवानगी देत नाहीत. तशी NOC त्यांना मालक देत नाही. तसंच काही मालक तर अव्वाच्या सव्वा पैसे मागतात. हाच मुद्दा माजी शिवसेना नगरसेवक दिलीप नाईक यांनी उचललाय. तसं पत्रही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.
ही गोष्ट प्रत्येक चाळी चाळीतली आहे. अनेक मुलांची लग्न होत नसल्याने मुलंही निराश आहेत. प्रत्येकाचीच दुसरीकडे घर घेण्याचीही ऐपत नाही अशी परिस्थिती आहे.
काळ बदलला तरी मुंबईच्या चाळकऱ्यांची व्यथा मात्र कायम
'तुम्हाला कोण व्हायचंय? मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर?' या प्रहसनात 'मुंबईकर व्हायचं असेल, तर चाळीच्या संडासाबाहेर तासन् तास उभं राहण्याची योगसाधना करावी लागेल', असं वर्णन पुलंनी त्यांच्या खास शैलीत केलंय...काळ बदलला तरी मुंबईच्या चाळकऱ्यांची व्यथा मात्र कायम आहे.