मेघा कुचिक, मुंबई : मुलींचे लग्नाचे वय आता १८ वरून २१ वर्ष होण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणात तसे संकेत दिले. मुलींच्या शारीरिक पोषणासाठी हा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. आपल्याकडे एक काळ असा होता जेव्हा १० व्या वर्षीच मुलीचे लग्न लावून दिले जात असे. मात्र विचारवंत, सामाजसेवक आणि अगदी ब्रिटिशांमुळे बालविवाहाची परंपरा मोडीत निघाली. विवाहासाठी सध्या मुलींचं किमान वय १८ आहे. मात्र मुलींचं शारीरिक पोषण योग्य पद्धतीने व्हावं आणि माता मृत्यूचं प्रमाण कमी व्हाव यासाठी मुलींचं विवाहासाठचं किमान वय वाढवण्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलींच्या लग्नाचं वय निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. १९२९ च्या कायद्यानुसार मुलींचं विवाहाचं किमान वय १४ आणि मुलांचं १८ होतं. १९७८ मध्ये या कायदयात सुधारणा करून ते अनुक्रमे १८ आणि २१ करण्यात आले. मात्र मुलींचं शारीरिक पोषण आणि माता मृत्यू पाहता यात बदल करण्यात येण्याची शक्यता असून महिला वर्गातून याचं स्वागत होत आहे. सुदृढ भारताच्या दृष्टीने योग्य निर्णय, अशी प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली आहे. मात्र केवळ विवाहवय वाढवून महिलांबाबतचे प्रश्न सुटतील का, असा सवालही विचारण्यात येत आहेत. 


मुलींच्या सुरक्षेसाठी त्यांची लवकर लग्न लावली जातात. अमेरिकेत तरी मुलींच्या विवाहाच्या वयाबाबत काही कायदा आहे, असे काही वाचनात आलेलं नाही. विवाहाची वयोमर्यादा वाढवून माता मुलींच्या मृत्यूचं प्रमाण कमी होणार नाही. त्यांचं पोषण होणार नाही. तर लहानपणापासूनच त्यांच्या पोषणाबाबत, शिक्षणाबाबत सर्वांगीण शिक्षणाबाबत घेतलेल्या योजना, निर्णय याची अंमलबजावणी करावी लागेल. शाळेच्या पोषण आहारापासून सुरुवात केली पाहिजे, अशाही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.



पोषणाशी संबंधित योजनांसाठी बजेटमध्ये ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बदलत्या काळानुसार मुलींचे विवाह वय बदलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यामुळे अनेक कोवळ्या मुलींचे जीव वाचतील आणि यातून एक सदृढ भारत घडेल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.