मुंबई : दिवगंत पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांचा मुलगा दीपेश शिंदेची उप-निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षी कर्तव्य बजावत असताना तरुणाने रॉडच्या सहाय्याने केलेल्या हल्ल्यात शिंदे यांना आपला जीव गमवावा लागला होता. 


विलास शिंदे यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात दीपेश शिंदेच्या नियुक्तीचे पत्र त्याच्या हाती सोपवण्यात आले. मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दीपेशला नियुक्तीचे पत्र दिले. 


२५ वर्षीय दीपेश बीएससी-आयटी पदवीधर आहे. तो मालाडस्थित कंपनीत नोकरीला होता. मात्र, आता त्याने ही नोकरी सोडलीये. 


'हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. माझ्या वडिलांनी सेवेत असताना झोकून देऊन काम केले. त्यांच्याच पावलावर मी पाऊल ठेवत काम करणार आहे', असे दीपेश यावेळी म्हणाला.


काय होते नेमके प्रकरण


गेल्या वर्षी २३ ऑगस्टला विलास शिंदे यांनी १७ वर्षीय मुलाला हेल्मेट आणि लायसन्सशिवाय गाडी चालवताना खार येथे पकडलं होतं. दरम्यान, अल्पवयीन आरोपीने अहमद कुरेशी या आपल्या भावाला बोलावून घेतलं. तेथे आलेल्या त्याच्या भावाने विलास शिंदे यांच्या डोक्यात रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात शिंदे जबर जखमी झाले होते. त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र ३१ ऑगस्ट २०१६ रोजी उपचारादरम्यान शिंदे यांचा मृत्यू झाला होता.