Gold Rates latest update : अरे बापरे! सोन्या- चांदीचे नवे दर पाहिले का?
जुलै महिन्यापर्यंत सोन्या- चांदीचे दर काही अंशी घसरण्यास सुरुवात होते
Gold Rates latest update : आर्थिक मंदीच्या काळातही सोन्या चांदीचे दर मात्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहियेत. काही महिन्यांपूर्वी 45 हजारांहूनही खाली पोहोचलेल्या सोन्या- चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसांमध्ये हे दर वाढल्यामुळं सोनं खरेदीसाठी निघणाऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलं आहे.
सोन्याचा भाव आज (26 जुलै 2021) 49 हजार रुपये प्रतितोळा इतका झाला आहे. तर, चांदीचे दरही 70 हजार रुपये प्रति किलोवर गेली आहे. सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या दिवसांमध्ये सोनं 3 हजारांनी तर चांदी 4 हजार रुपयांनी वाढली आहे.
एरव्ही जुलै महिन्यापर्यंत सोन्या- चांदीचे दर काही अंशी घसरण्यास सुरुवात होते. पण, यावेळी एप्रिलपासूनचा लग्नसराईचा माहोल जुलै महिन्यातही कायम आहे आणि त्यातच सोन्याच्या दरांनी नवी उंची गाठली आहे.
साधारण नवरात्रोत्सवापासून सोन्या- चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळते. तर, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत सराफा बाजार काहीसे संथ गतीनं कार्यरत असतात. मात्र गेल्या वर्षभरापासून हे चित्र पुरतं बदललं आहे.
जाणकारांकडून सोनं खरेदीचा सल्ला
गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा दर एका विशिष्ट पातळीत वरखाली होताना दिसत आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या उदयानंतर सोन्याचे भाव (Gold rates) पुन्हा वर जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सोन्याचा दर आणखी खाली आल्यास खरेदीचा सल्ला जाणकारांकडून दिला जात आहे.