मुंबई : सध्या सोने आणि चांदीच्या किमतीत तेजी दिसून येत आहे. याचा परिणाम हा सोने खरेदीवर दिसून येत आहे. दरम्यान,  आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचा भाव वधारलाय. त्याचवेळी भारतीय चलन रुपयाची झालेली घसरण आणि कच्च्या तेलाच्या दरात झालेली वाढ यांमुळे दिल्लीसह मुंबई सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. सोने दर चढाच दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात सोने ३७ हजारांच्या घरात होते. आता सोने दर ३८ हजारांच्या घरात गेला आहे. त्याचवेळी ४७५ रुपयांच्या तेजीसह प्रति दहा ग्रॅमसाठी सोने दर पुन्हा ३८,००० रुपयांच्यावर गेला. तर ३७० रुपयांच्या वाढीसह चांदीही प्रति किलो ४४,६८० रुपयांवर पोहोचली आहे. 
 
आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये सोने दरात तेजी कायम आहे. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति औंस सोने १५२४.९० डॉलर झाले, तर चांदी प्रति औंस १७ डॉलरवर पोहोचली. स्थानिक पातळीवर दोन्ही धातूंचे भाव वाढल्याने मागणी कमी असल्याचेही दिसून येत आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सणातही महिलांकडून सोने खरेदीला अल्प प्रतिसाद मिळत आहे. तसेच  गणेशोत्सवाची लगबग सुरु असताना सोन्याच्या दागिन्यांना मात्र मंडळांकडून यंदा मागणी नाही. त्यामुळे सोन्याच्या कारखान्यांमध्ये शुकशुकाट दिसत आहे. सोने महाग झाल्यामुळे यंदा बाप्पाला मोत्याची माळ अन् सोनेचा मुकुट मिळणार नाही, असे चित्र दिसून येत आहे. यंदा गणेशोत्सवात सोने व्यापार तब्बल ६० ते ७० टक्यांनी घटला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ२५ ते ३० टक्केच मागणी आहे. एका दागिन्याची किंमत गेल्या काही वर्षांच्या तुलनेत दुपटीने वाढल्याचा फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. 


सोने दर वाढीचा परिणाम हा व्यवसायावरीही दिसून येत आहे. मागणीत घट झाल्याने व्यापारी आणि सोने तयार करणारे कारखानदारही चिंतेत आहेत. गिरगावात पारंपारिक हे बाप्पाचे दागिने गेल्या कित्येक वर्षांपासून तयार केले जातात. पण यंदा व्यापार मंदावला असल्याने शेकडो कारागिरांना फटका बसत आहे. ही परिस्थिती कायम राहीली तर दिवाळीतही सोने दर किंबहूना वाढतील, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.