अतिश भोईर, झी मीडिया, कल्याण : कल्याणकरांची डम्पिंगच्या दुर्गंधीतून आता लवकरच मुक्तता होणार आहे. डम्पिंग ग्राउंडवर पार्क बनविण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यामुळं येत्या विजया दशमीच्या मुहूर्तावर आधारवाडी डम्पिंग बंद करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. त्यामुळे कल्याणकरांसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी ठरली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर दररोज ६५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. मात्र लॉकडाऊनच्या काळात पालिकेने कचरा वर्गीकरण मोहीम राबविल्याने त्यापैकी ५०० टन कचऱ्याचे नागरिकांकडून वर्गीकरण होत आहे. त्यामुळे सध्या १५९ टन कचरा डम्पिंगवर टाकला जातोय.



या कचऱ्याचे स्क्रीनिंग करून  त्याठिकाणी पार्क चा प्रस्ताव पालिकेने तयार केला असून विजया दशमीपासून आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकणे बंद करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.मागील ४० वर्षापासून डम्पिंगच्या दुर्गधीचा त्रास  कल्याणकर सोसत आहेत. 


डम्पिंग बंद करण्याचे पालिकेचे अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत.  न्यायालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनीही पालिकेला डम्पिंग वरून फटकारले आहे. मात्र पालिका प्रशासनाच्या मोहिमेला यश आल्याने लवकरच कल्याणकारांची डमिंगच्या दुर्गंधीतून सुटका होणार असल्याची माहीती  केडीएमसी उपायुक्त विजय कोकरे यांनी दिली.