मुंबई : मुंबई लोकलं ही मुंबईची धावती नस आहे, ती कधीही थांबत नाही. त्यामुळे मुंबईकर देखल कधीही थांबत नाही. परंतु कोरोनाच्या साथीमुळे मुंबई लोकलला थांबवलं गेलं. तेही दीर्घकाळासाठी. त्यानंतर फक्त सरकारी आणि अत्यावशक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच यामधून प्रवास करता यायचं. ज्यामुळे सामान्य लोकांचे हाल झाले. परंतु आता बऱ्यापैकी लसीकरण झाल्यामुळे आणि कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे मुंबई लोकलं आता रुळावर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यातच आता एसी लोकलकडे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी पश्चिम रेल्वेने मोठे पाऊल उचललं आहे. यामध्ये आता एसी लोकलमधून नॉन एसी किंवा सेकंड क्लासमधील प्रवाशांनाही प्रवास करता येणार आहे आणि असे केल्यास प्रवाशांना कुठलाही दंड भरावा लागणार नाही. तसेच मासिक पासधारकांना देखील या एसी लोकलमधून प्रवास करता येणार आहे.


मात्र प्रवास करताना प्रवाशांना त्या एसी ट्रेनचे पैसे भरावे लागणार आहे. ही रक्कम तुमच्याकडे असलेल्या तिकीटाची किंमत आणि एसी लोकच्या तिकीटाची किंमत यामधील फरक असेल. तेवढी किंमत प्रवाशांना भरावी लागेल, तरच ते एसी लोकलने प्रवास करु शकतील.


एसी लोकलमधील प्रवाशांची संख्या वाढावी यासाठी पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.


2017 साली एसी ट्रेन कार्यरत झाली होती. मात्र अद्यापही या ट्रेनला प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर आलोक कंसल यांनी याबाबत सांगितले की,जास्तीतजास्त प्रवासी पश्चिम रेल्वेकडे वळावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, या प्रयोगाची चाचणी एका महिन्याच्या आत सुरू केली जाणार आहे. लवकरच याबाबत सविस्तर माहिती प्रवाशांना देण्यात येईल.


सध्या चर्चगेट ते विरारदरम्यान जाणाऱ्या एसी लोकलचे तिकीट हे किमान 65 ते कमाल 220 रुपये एवढे आहे. कंसल यांनी पुढे सांगितले की, येत्या दिवसांमध्ये एसी लोकलच्या फेऱ्याही वाढवण्यात येणार आहेत. सध्या पश्चिम रेल्वेजवळ चार एसी रेल्वे गाड्या आहेत. यामध्ये केवळ दोन लोकल ह्या सुरू आहेत, त्या दिवसातून 12 फेऱ्या करतात.