मुंबई : अनोळखी वाटांवर निघालेल्या अनेकांसाठी मदतीच्या ठरणाऱ्या गुगल मॅप्सची आता आणखी एक मदत सर्वांनाच होणार आहे. अवघ्या जगाचा डिजीटल वाटाड्या म्हणून ओळख असणाऱ्या गुगल मॅपवर मुंबईतील coronavirus कोरोना प्रतिबंधात्मक अर्थात कंटेन्मेंट झोनची परिसरांची अद्ययावत माहिती जाणून घेण्याची सोय आता युजर्सना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बृहन्मुंबई महानगरपालिकेची ही भन्नाट कल्पना प्रत्यक्षात अवतरली असून त्यामध्ये आणखी नावीण्य आणण्यात येईल. त्याचे महत्त्व पाहता जगातील इतर शहरांनीही आता त्याचे अनुकरण करण्यास सुरुवात केली आहे.


कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांची आणि अथक प्रयत्नांची जागतिक आरोग्य संघटनेने पाठोपाठ जागतिक बँकेने देखील दखल घेतली. या उपाययोजना करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन पारदर्शकपणे माहिती पुरवण्यातही बृहन्‍मुंबई महानगरपालिका अग्रभागी आहे. 


कोरोना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक क्षेत्र हा एक महत्त्वाचा घटक आहे. अवाढव्य मुंबई महानगरात अश्या प्रतिबंधात्मक क्षेत्रांची अद्ययावत स्थिती नागरिकांना ठाऊक असणे, अतिशय महत्त्वाचे आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्रांची यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरुन नियमितपणे प्रकाशित करण्यात येते. या संकेतस्थळावर मुंबईतील २४ विभागनिहाय नकाशांमध्ये प्रतिबंधात्मक क्षेत्रदेखील दर्शविण्यात येतात. असे असले तरी प्रत्येक नागरिकाला एका क्लिकवर आणि सहजसोप्या पद्धतीने त्यांची माहिती व्हावी, त्याची व्यापकता वाढावी या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने गुगल मॅपची मदत घेण्याचे ठरवले. गुगलला देखील ही कल्पना आवडली आणि त्यांनी गुगल मॅपवर या प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे आरेखित नकाशे उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केली आहे.


कसा पाहावा हा नकाशा...


महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांकडून वेळोवेळी पुरवल्या जाणाऱया अद्ययावत माहितीनुसार हे प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे नकाशे सर्व नागरिकांना पाहता येतील. त्यासाठी मोबाईलवर गुगल मॅप हे ऍप्लीकेशन सुरु केल्यानंतर “कोविड १९ इन्फो” हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर मुंबई महानगराचा नकाशा “झूम” करुन पाहताना वेगवेगळे प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे आरेखन करड्या रंगात व कोविड १९ कन्टेन्मेंट झोन या उपशीर्षकासह दिसू लागतात. प्रत्येक प्रतिबंधात्मक परिसराचे नावही सोबत झळकते. यामुळे आपण नेमके कोठे आहोत, आपला परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र आहे किंवा नाही, असे प्रतिबंधात्मक परिसर टाळून प्रवासाचे नियोजन कसे करावे, हे नागरिकांना समजणे सोपे होणार आहे. नुकतीच ही सुविधा सुरु झाली असून त्यामध्ये वेळोवेळी आवश्यक ते बदल करण्यात येतील. 


गुगल मॅपवर “कोविड १९ इन्फो”  हा पर्याय निवडल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका या पर्यायावर क्लिक केलं असता थेट महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर stopcoronavirus.mcgm.gov.in या पृष्ठावर कोरोना विषयक माहिती देखील पाहता येते. 


 


गुगलसोबत मिळून महानगरपालिकेने याआधी इतरही उपक्रम राबविले आहेत. गुगल सर्च इंजिनमध्ये मुंबई कोरोना व्हायरस अपडेटस् असे टाईप करताच महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरुन तसेच समाजमाध्यम स्थळांवरुन (सोशल मीडिया) विशेषत: ट्‍विटरवरुन प्रसारित होणारी माहिती दिसते. 


कोरोनाविषयक रुग्णसंख्या, रुग्णालयं, रुग्णशय्या, वेगवेगळ्या आकडेवारीचे विश्लेषण या सर्वांचा डॅशबोर्ड माहिती स्वरुपात संकेतस्थळावर दररोज उपलब्ध करुन दिला जातो. हा डॅशबोर्ड इतका माहितीपूर्ण व समजण्यास सहजसोपा आहे की त्याचे इतर शहरांनीही अनुकरण केले आहे. त्यापाठोपाठ आता गुगल मॅपवर मुंबईने उपलब्ध करुन दिलेल्या प्रतिबंधात्मक क्षेत्रांचे नकाशेदेखील इतर शहरांच्या पसंतीस उतरले आहेत. यामुळे इतर शहरांच्या प्रशासनानेही गुगलसोबत मिळून त्याचा कित्ता गिरवायला सुरुवात केली आहे.