मुंबई: शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्तावाटपावरून मानापमान नाट्य रंगल्याने विधानसभेच्या निकालाला सात दिवस उलटूनही राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. विद्यमान फडणवीस सरकारचा कालावधी ९ नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे यापूर्वी राज्यात सरकार स्थापन करणे गरजेचे आहे. त्यामुळे सध्या राजकीय पक्षांची पडद्यामागे जोरदार खलबते सुरु आहेत. शिवसेना ५६ , राष्ट्रवादी ५४ व काँग्रेस ४४ एकत्र आल्यास १५४ संख्याबळ होते. याशिवाय शिवसेनेने सात अपक्षांचा पाठिंबा मिळविला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सरकार स्थापनेचे काय पर्याय असतील, याचा घेतलेला हा आढावा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. शिवसेनेची साथ घेऊन भाजप सरकार स्थापन करेल. या शक्यतेनुसार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि शिवसेनेचा उपमुख्यमंत्री असेल.


२. शिवसेनेने पाठिंबा देण्यास नकार दिल्यावर भाजप स्वबळावर अल्पमतातील सरकार स्थापन करेल. यानंतर भाजपकडून १५ दिवसांत विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येईल. त्यावेळी राष्ट्रवादी तटस्थ राहू शकते. त्यामुळे बहुमताचा आकडा १४५ वरून खाली येईल.


३. भाजपकडून शिवसेनेच्या आमदारांमध्ये फूट पाडून बहुमत सिद्ध करण्याची शक्यता नाकारता येणार नाही.


४. भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नाही तर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आतून किंवा बाहेरून पाठिंबा मिळवून सरकार स्थापन करु शकते.


५. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसच्या साथीने सरकार स्थापन करेल. यावेळी शिवसेना त्यांना बाहेरून पाठिंबा देऊ शकते.


६. भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पैकी कुणालाही सरकार बनवण्यात अपयश आले तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यावाचून पर्याय उरणार नाही.