मोठी बातमी: राज्यपालांकडून सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला विचारणा
शिवसेनेला सोमवारी रात्री आठ वाजेपर्यंत राज्यपालांसमोर बहुमताची आकडेवारी सादर करावी लागेल.
मुंबई: भाजपने सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवडणुकीतील दुसरा मोठा पक्ष असणाऱ्या शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी विचारणा केली आहे. त्यानुसार शिवसेनेला सोमवारी रात्री आठ वाजेपर्यंत राज्यपालांसमोर बहुमताची आकडेवारी सादर करावी लागेल. शिवसेनेकडे बहुमत आहे याची खात्री पटल्यानंतरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्यांना सत्तास्थापनेचे निमंत्रण देतील. अन्यथा राज्यपाल वेगळ्या पर्यायाचा विचार करतील, असे सांगितले जात आहे.
यानंतर आता मातोश्रीवरील घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. थोड्याचवेळात मातोश्रीवर शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होणार आहे. राज्यपालांसमोर बहुमतासाठी आवश्यक असणारे संख्याबळ कसे सादर करायचे, याविषयी बैठकीत खल होण्याची शक्यता आहे. इतके दिवस केवळ पडद्यामागे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा शिवसेनेला पाठिंबा असल्याची चर्चा होती. मात्र, आता शिवसेनेला प्रत्यक्षात हे सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे अजूनही कुंपणावर बसून असलेल्या काँग्रेसशी वेगाने वाटाघाटी करून त्यांना पाठिंब्या देण्यासाठी राजी करणे, शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आता खऱ्या अर्थाने मैदानात उतरण्याची शक्यता आहे. काहीवेळापूर्वीच शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना अभिनंदनाचा फोन केल्याचे सांगितले जाते. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस विरोधातच बसणार असल्याचे काहीवेळापूर्वीच प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले होते. त्यामुळे आता शरद पवार आपली भूमिका बदलणार का, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरेल.
तत्पूर्वी भाजपने राज्यपालांना भेटून आम्ही सरकार स्थापन करणार नसल्याची माहिती दिली. या निर्णयाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली होती. भाजप, शिवसेना, रिपाई, रासप आणि रयत क्रांती अशा महायुतीने एकत्र विधानसभा निवडणूक लढवली होती. जनतेने महायुतीला भरघोस जनादेशही दिला होता.
मात्र, शिवसेनेने जनमताचा अनादर करत सरकार स्थापन करण्यास नकार दिला. त्यामुळे भाजपने सरकार न स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून सरकार स्थापन करायचे असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते.