मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता राज्यात उमटू लागले आहेत. समर्थ रामदास स्वामी नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय? असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. औरंगाबादेत आयोजित समर्थ साहित्य परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरू शिष्य परंपरेचं महत्त्व सांगताना त्यांनी हे वक्तव्य केलं. समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराज नसते, असं ते म्हणाले. समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं होतं.


वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद
भाजप खासदार उदयनराजे भोसले ( MP Udayanraje Bhosale) यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर टीका केलीय. राज्यपालांनी महाराष्ट्राच्या भावना दुखावल्याची टीका त्यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे ' राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरू होते असे वक्तव्य करून शिवप्रेमीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे.



राज्यपालांनी माफी मागण्याची मागणी
राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्यपालांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. त्यांनी ट्विट करुन राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय, 'खोटा इतिहास सांगून थोर महापुरुषांचा खरा इतिहास पुसण्याचे प्रयत्न देशात इतरत्र यशस्वी होत असतीलही, परंतु महाराष्ट्रात असले प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत, हे सर्वांनीच लक्षात ठेवावं'


राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून, सर्वांना सोबत घेत आदर्श राज्यकारभार केला. सर्वसामान्य जनतेचं हित, हीच त्यांची निती आणि शिकवण होती.


खरा इतिहास माहीत करून न घेता आपला अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर हे नक्कीच निषेधार्ह आहे आणि असं होत असताना गप्प बसणं हे त्याहून अधिक निषेधार्ह आहे. #राज्यपाल_माफी_मागा' असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.



पुण्यात राष्टवादीचं आंदोलन
राष्ट्रवादीने पुणे महापालिकेत जोरदार आंदोलन केलं. राज्यपालांनी शिवाजी महाराजांचा अपमान केल्याची टीका राष्ट्रवादीने केलीय. राज्यपालांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादीने केलीय.