मुंबई : राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमात  बदल करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान आता १४  ऐवजी १६ ऑक्टोबर२०१७  रोजी होणार आहे. तर मतमोजणी दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ ऑक्टोबर रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य निवडणूक आयोगाने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाऱ्या ७ हजार ५७६ ग्रामपंचायतींच्या सर्वत्रिक निवडणुकांचा दोन टप्प्यांतील कार्यक्रम १ सप्टेंबर २०१७ जाहीर केला होता. त्यानुसार ७ आणि१४ ऑक्टोबर २०१७ रोजी मतदान होणार होते; परंतु १४ ऑक्टोबर २०१४ रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन असल्यामुळे मतदानाच्या तारखेत बदल करण्यात यावा, अशी विनंती विविध घटकांकडून करण्यात आली होती. 


गोंदियात दुपारी ३ पर्यंतच मतदान


गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार या जिल्ह्यातील देवरी, सालेकसा, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोर या चार नक्षलग्रस्त तालुक्यांतील मतदानाची वेळ सायंकाळी ५.३० ऐवजी दुपारी केवळ ३ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. या ठिकाणीदेखील दुसऱ्या टप्प्यात १६ ऑक्टोबर २०१७ रोजी मतदान होणार आहे.


दुसऱ्या टप्यात १४ ऐवजी १६ ऑक्टोबर २०१७ रोजी मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी: ठाणे- ४१, पालघर- ५६, रायगड- २४२, रत्नागिरी- २२२, सिंधुदुर्ग- ३२५, पुणे- २२१, सोलापूर- १९२, सातारा- ३१९, सांगली- ४५३, कोल्हापूर- ४७८, नागपूर- २३८, वर्धा- ११२, चंद्रपूर- ५२, भंडारा- ३६२, गोंदिया- ३५३ आणि गडचिरोली- २६. एकूण- ३६९२