`लाडक्या बाप्पा` साठी तब्बल २६४ कोटींचा विमा
गणेशोत्सवाच्या या काळात उत्सव मुर्ती, कार्यकर्ते, भाविक यांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमी उभा असतो.
मुंबई : गणेशोत्सव काही दिवसांवर आलाय. भाविक आपल्या लाडक्या बाप्पाच्या भेटीसाठी आतुरलेले आहेत. गणेशोत्सवाच्या या काळात उत्सव मुर्ती, कार्यकर्ते, भाविक यांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमी उभा असतो.
पण अनेक मोठमोठ्या उत्सव मंडळांनी याची योग्य खबरदारी घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईतील काही मोठ्या मंडळांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विमा उतरविला आहे.
यामध्ये जीएसबी सेवा मंडळ अव्वल स्थानी आहे. किंग्जसर्कलच्या जीएसबी सेवा मंडळाने यंदा २६४ कोटींचा विमा उतरवला असून यामध्ये श्रींची मूर्ती, मंडप, दागिने आणि भक्तांसह नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱया नुकसानीचाही समावेश करण्यात आला आहे.
मंडळाच्या कार्यकर्त्यांचा २२४ कोटी, भक्तांसाठी २० कोटी आणि बाप्पांच्या दागिन्यांचा २० कोटींचा विमा उतरविण्यात आल्याची माहिती ट्रस्टी आर.जी.भट यांनी दिली.मुंबईतील सर्वात श्रीमंत मंडळ म्हणून या मंडळाची ख्याती आहे.
जीएसबी मंडळातर्फे पाच दिवस धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळाकडे ७० किलो सोने आणि ३५० किलो चांदीचा समावेश आहे.
आता सर्वात सुरक्षेची काळजी घेण्यातही हे मंडळ अग्रस्थानी असल्याचे पाहायला मिळत आहे.
‘लालबागचा राजा’चा ५१ कोटींचा विमा !
‘नवसाला पावणारा’ म्हणून ओळखल्या जाणाऱया ‘लालबागचा राजा’ला सर्वाधिक गर्दी होते. भक्तांच्या आणि कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यंदा मंडळातर्फे मोठे पाऊल उचलले गेले आहे. यावर्षी मंडळातर्फे ५१ कोटींचा विमा उतरवण्यात आला आहे.
‘मुंबईचा राजा’ चा ७ कोटींचा विमा !
‘मुंबईचा राजा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेशगल्ली येथील ‘लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ही विमा उतरविण्यामध्ये मागे नाहीए. या उत्सव मंडळातर्फे ७ कोटींचा विमा उतरविण्यात आला आहे.
अंधेरीच्या राजाचा ५.५० कोटींचा विमा
‘आझाद नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ने (अंधेरीचा राजा) ५.५० कोटींचा विमा उतरवला आहे.