मुंबई : मराठी नववर्ष दिन असलेल्या गुढीपाडव्याच्या सणावर यावेळी कोरोनाचं सावट आहे. तरीही मुंबईत आपआपल्या पद्धतीनं हा सण साजरा करण्याचा प्रयत्न मराठी कुटुंबं करत आहेत. गुढीसाठी काठ्या, फुलं आणि कडुनिंबाची पानं-फुलं दरवर्षी बाजारात येतात. पण कोरोनामुळे यावर्षी पूर्ण लॉकडाऊन झाल्यानं काठ्या, फुलं, कडुनिंबाची पानं बाजारात उपलब्ध नाहीत. एरवी गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधीपासूनच गजबजणारं दादरचं फुलमार्केटही यावेळी मोकळं, ओस पडलं आहे. त्यामुळे लोकांनी कडुनिंबाची पानं आणि फुलांशिवाय अत्यंत साध्या पद्धतीनं घरच्या घरीच काहीतरी पर्याय शोधून गुढीपाडवा साजरा करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनमुळे घरीच राहण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे. त्यामुळे या गुढीपाडव्याला सर्वजण घरी असले तरी सणाच्या उत्साहाऐवजी कोरोनाच्या भीतीचं सावटच गुढीपाडव्यावर आहे.



गुढीपाडव्याच्या सणासाठी काठ्यांबरोबर, कडुनिंबाची पानं, चाफ्याची फुलं, आंब्याची डहाळी, बत्ताशे याची विक्री मुंबईसारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात होते. यावर्षी लोकांना याशिवायच गुढीपाडवा साजरा करण्याची वेळ आली आहे.


चैत्रात कडुनिंबाला नव्यानं पालवी येते. कडुनिंब हे गुणकारीही आहे. गुढीपाडव्याला कडुनिंबाच्या पानांची चटणी करण्याची प्रथाही आहे. त्यामुळे रक्तातील दोष दूर होतात असा समज आहे. त्यामुळे कडुनिंबाची पानं मोठ्या प्रमाणात विक्रीला येतात. यावर्षी कडुनिंबाची पानं लोकांना मिळालीच नाहीत.


गिरगाव, डोंबिवली या ठिकाणी शोभायात्रांमुळे दरवर्षी गुढीपाडव्याचा उत्साह अगदी रस्त्यावरही ओसंडून वाहत असतो. यावर्षी सगळे रस्ते सुने आहेत. गिरगावातील मराठी कुटुंबांनी साध्या पण पारंपरिक पद्धतीनं गुढीपाडवा साजरा केला.


गिरगावातल्या खोताचीवाडी परिसरात आदनवाले परिवारानं गुढीपाडवा साध्या पद्धतीनं साजरा करताना कोरोनाचं संकट दूर होऊदे, अशी प्रार्थना केली. गुढी उभारून गुढी पाडवा साजरा करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात आज हीच भावना असेल.