एकनाथ खडसे शिवसेनेच्या संपर्कात, गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
जळगाव जिल्हा परिषदेत भाजपात फूट पडण्याची शक्यता
मुंबई : जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपमध्ये नाराज असलेल्या एकनाथ खडसेंची साथ शिवसेनेला मिळेल असे संकेत शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. खडसे आपल्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शिवसेनेच्या ताब्यात येईल असं त्यांनी म्हटलंय. जळगाव जिल्हा परिषद भाजपकडून हिसकावून घेण्यासाठी शिवसेनेनं कंबर कसलीय.
अनेक जण शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. आत्तापर्यंत खडसे हे राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं बोललं जात होतं. खडसे यांनी याआधी शरद पवार यांच्याशी काही वेळा भेटी घेऊन चर्चाही केली होती.
जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष निवडीसाठी घडामोडी सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या टप्प्यात भाजपने काँग्रेसच्या टेकूवर सत्ता प्रस्थापित केली होती. तेव्हा भाजपच्या सदस्या उज्ज्वला पाटील यांची अध्यक्षपदी वर्णी लागली होती. आता मात्र, राज्याच्या सत्तेत काँग्रेस पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत असल्याने काँग्रेस सोडून जाईल, अशी भीती भाजपला आहे. ऐनवेळी दगाफटका होऊ नये म्हणून भाजप सावधपणे चाचपणी करत आहे.
शनिवारी भाजप नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सर्व सदस्यांची एकत्रित बंददाराआड बैठक घेतली. अध्यक्ष कुणाचाही असला तरी चालेल मात्र तो महाविकासआघाडीचाच असावा अशी भूमिका महाविकासआघाडीनं घेतली आहे. त्यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ होणार आहे.