Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना कोठडी, अटकेत असणाऱ्या त्या एसटी कामगारांचं काय?
सिल्व्हर ओक आंदोलन प्रकरणात पोलिसांनी आतापर्यत 107 जणांवर गुन्हा दाखल केलाय. यात 23 महिला आरोपी आहेत.
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' निवासस्थानी झालेल्या हल्ला प्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलीय. या कर्मचाऱ्यांवर दंगल परिस्थिती निर्माण करणे आणि षडयंत्र रचणे अशी विविध कलमे लावण्यात आली आहेत.
सिल्व्हर ओक आंदोलन प्रकरणात पोलिसांनी आतापर्यत 107 जणांवर गुन्हा दाखल केलाय. यात 23 महिला आरोपी आहेत. येलो गेट पोलीस ठाण्यात आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवला जात आहे. हे सर्व कर्मचारी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
अटक करण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलाय. परंतु, या प्रकरणात पोलिसांनी आपले उत्तर दाखल करण्यासाठी न्यायालयाकडून वेळ मागितला आहे.
पोलिसांच्या या मागणीचा विचार करून न्यायालयाने वेळ वदवून दिला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. एसटी कामगारांसोबत या प्रकरणात अटक करण्यात आलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या ही जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.