कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)  यांच्यासह शिंदे गटातील मंत्री व आमदार यांचा गुवाहाटी (Guwahati) दौरा एकदम फायनल झाला आहे. आधीच नियोजीत असलेल्या या गुवाहाटी दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल झाला होता. आता या दौऱ्याची नवी तारीख शिंदे गटाकडून जाहीर करण्यात आली असून या दौऱ्याचे नियोजन कसे असेल याची देखील माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे अर्थात शिंदे गटाचे सर्व आमदार 21 नोव्हेंबरला गुवाहाटी दौऱ्यावर जाणार होते. मात्र, 21 तारखेचा दौरा रद्द करण्यात आला होता. आता या दौऱ्याची नवी तारीख जाहीर झाली आहे.  शिंदे गटाचे सर्व आमदार आणि खासदार कुटुंबासह 26 नोव्हेंबरला संध्याकाळी गुवाहाटीला जाणार आहेत.  27 नोव्हेंबरला सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार, खासदार आणि त्यांचे कुटुंबीय प्रसिद्ध कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. 


आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे गुवाहाटीत जंगी स्वागत करणार आहेत.  विशेष म्हणजे शिंदे गटाचे 150 हून अधिक प्रतिनिधी एकाच विमानाने गुवाहाटीला जाणार आहेत.  एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाळीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. एकनाथ शिंदे 40 आमदारांना घेवून प्रथम सुरतला गेले. यानंतर त्यांनी या आमदारांना घेऊन थेट गुवाहाटी गाठली. शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल या डायलॉगलमुळे गुवाहाटी चर्चेत आले.