फडणवीस यांच्याकडून राणा दाम्पत्याची पाठराखण, हनुमान चालीसा पाकिस्तानात म्हणायची का?
Hanuman Chalisa: Devendra Fadnavis supported to Rana couple : विरोधी पक्षाला संपवण्याचा डाव आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी केला.
मुंबई : Hanuman Chalisa: Devendra Fadnavis supported to Rana couple : राज्याच्या गृहमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठकीचे निमंत्रण दिले होते. पण चार पाच दिवस होणाऱ्या घटना पाहता या सरकारने संवादासाठी जागा ठेवली नाही. हिटलर शाहीने वागत असतील तर संवादा पेक्षा संघर्ष करु. यामुळे आम्ही बैठकीवर बहिष्कार घातला, असे स्पष्टीकरण देत विरोधी पक्षाला संपवण्याचा डाव आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी केला. त्याचवेळी फडणवीस यांनी राणा दाम्पत्याची पाठराखण करताना, हनुमान चालीसा पाकिस्तानात म्हणायची का, असा सवाल केला.
पोलखोल यात्रेच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढला. आमच्या पोलखोल यात्रेवर हल्ला करण्यात आला. आमची भ्रष्टाचार विरोधातील लढाई सुरु राहणार आहे. किरीट सोमय्या, कंबोज यांच्या पोलीस संरक्षणात हल्ला झाला. कंबोज प्रकरणी मॉब लिंचिंगचा प्रयत्न झाला.पोलिसांचा दुरुपयोग सुरु आहे. खोट्या केसेस टाकल्या जात आहेत. गृहमंत्र्यांना अधिकार नाही. सर्व काही मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर मुंबईत सुरु आहे, असा गंभीर आरोप केला.
मुख्यमंत्री नसलेली बैठक म्हणजे टाइम पास आहे. राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणणार होते. हनुमान चालीसा मग काय पाकिस्तानात म्हणायची ? एका स्त्रीला अटक करता आणि पाकिस्तान सोबत युद्ध जिंकल्याचा आनंद साजरी करता. आजीची भेट काय घेतायत. आत्महत्या ग्रस्त एसटी कर्मचारी, शेतकरी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असती तर समजले असते. राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा हास्यास्पद आहे, असे फडवणीस म्हणाले. हनुमान चालीसा म्हणणार म्हणून राजद्रोह हा गुन्हा दाखल होत असेल तर आम्ही रोज करु, असे आव्हान त्यांनी दिले.
खासदार नवनीत राणा यांना तुरुंगात हीन वागणूक दिली जात आहे. त्या दलित असल्याची जाणीव करुन दिली जात आहे. आता आम्हाला संघर्षाशिवाय पर्याय नाही. आम्ही घाबरणार नाही. आम्ही जशास तसे उत्तर देऊ. आमच्यात ताकद आणि हिंमत आहे. आमच्याशी ठोकशाहीने वागाल तर जशास तसे उत्तर मिळेल, असा इशारा फडवणीस यांनी यावेळी दिला.