Mumbai Local News Update:  मुंबई शहरात प्रवास करण्यासाठी परवडणारे व जलद साधन म्हणजे मुंबई लोकल. मुंबई लोकलही सर्वसामान्यांची लाइफलाइन आहे. लोकल विस्कळीत झाल्यास प्रवाशांना फार मनस्ताप करावा लागतो. सोमवारी सीएसएमटी स्थानकात लोकल घसरली होती. आज त्याच ठिकाणी ब्लॉक घेऊन चाचणी घेण्यात आली. मात्र, अद्यापही हार्बर मार्गावरील वाहतूक सुरू झाली नाहीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ज्या ठिकाणी सोमवारी दुर्घटना घडली तिथेच पुन्हा एकदा आज चाचणी घेण्यात आली. त्याच ठिकाणी दुरुस्तीनंतर आज रिकामी लोकल चालवण्यात आली. मात्र त्याच ठिकाणी पुन्हा रेल्वेचा डबा घसरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं हार्बर मार्गावरील वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. काही काळासाठी हार्बर रेल्वे मार्गावरील सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.


मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी स्थानकात ज्या ठिकाणी लोकल घसरली, त्याच ठिकाणी आज ब्लॉक घेऊन चाचणी करण्यात येत होती. त्या ठिकाणी असलेल्या एका पॉईंट वर दुरुस्ती करून पुन्हा एकदा रिकामी लोकल चालवण्यात आली. पण ही रिकामी लोकल देखील पुन्हा त्याच ठिकाणी घसरली. लोकलचा एक डबा घसरला आहे.


चाचणी दरम्यान चालवण्यात आलेली ही लोकल पूर्णतः रिकामी होती आणि यामुळे पुन्हा एकदा हार्बर मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. वडाळा ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णतः बंद आहे. जोपर्यंत ही घसरलेली रिकामी लोकल पुन्हा एकदा रुळांवर आणत नाही तोपर्यंत वाहतूक बंद असेल. 


रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे विभाग बचाव पथक कामाला लागलं आहे. तातडीने ट्रॅक सामुग्रीची जमवाजमव केली जात आहे. दुरुस्तीच्या कामासाठी प्लॅटफॉर्म पूर्णपणे रिकामा केला आहे. काम पूर्ण होण्यासाठी साधारण दोन तास लागू शकतात, अशी माहिती देण्यात येतेय. त्यामुळं प्रवाशांसाठी पनवेल, खारघरला जाणाऱ्या लोकल फलाट क्रमांक 3 वरुन सोडल्या जाणार आहेत. तसंच, सुट्टीचा दिवस असल्याने प्रवाशांची गर्दी कमी आहे.