मुंबई: हार्बर रेल्वेच्या मस्जिद बंदर स्थानकानजीक सोमवारी सकाळी रेल्वे रुळाला तडे गेल्याचे निदर्शनास आले. यामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सध्या पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे  आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमन्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, हार्बर रेल्वेकडून हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी आणखी किती वेळ लागेल, याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. 


गेल्या काही महिन्यांमध्ये तांत्रिक बिघाडामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक अनेकदा विस्कळीत झाली आहे. याविरोधात प्रवाशांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त करूनही रेल्वे प्रशासनाच्या कारभारात कोणताही फरक पडलेला नाही.