मुंबई: तांत्रिक बिघाड पाचवीला पुजलेल्या हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक सोमवारी सकाळी पुन्हा एकदा ठप्प झाली. मानसरोवर स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली होती. या बिघाडामुळे पनवेल ते बेलापूर या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन या दोन्ही दिशांची वाहतूक ठप्प झाली होती. अखेर तीन तासांच्या प्रयत्नानंतर वाहतूक पुन्हा सुरु करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. मात्र, या काळात ट्रेनचे वेळापत्रक कोलमडल्याने अजूनही गाड्या उशीराने धावत आहेत. ही परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही काळ जावा लागेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. ऐन गर्दीच्या वेळेत हा खोळंबा झाल्यामुळे रेल्वे स्थानकांवरील गर्दी वाढतच आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी नेमका किती कालावधी लागले, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 


काही दिवसांपूर्वीच हार्बर रेल्वेमार्गावरील मानखुर्द ते गोवंडी स्थानकांदरम्यान रुळ ओलांडताना ट्रेनची धडक लागून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. यानंतर बराच काळ तरुणाचा मृतदेह रुळावर पडून होता. या काळात अनेक लोकल गाड्या त्याच्या अंगावरून गेल्याने मृतदेह छिन्नविछिन्न झाला. यावरून हार्बर रेल्वे प्रशासनावर बरीच टीकाही झाली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने हा दावा फेटाळून लावला होता. 


या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाला अॅक्शन प्लॅन तयार करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईतील रेल्वेमार्गांवर रोज किमान दहा प्रवाशांचा अपघाती मृत्यू होतो. यात रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. या घटना रोखण्यासाठी काय करता येईल, याबद्दल अॅक्शन प्लॅनमध्ये उपाययोजना असतील.