मुंबई : काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी भाजपात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. यामुळं इंदापूर आणि बारामतीतली राजकीय गणितं कशी बदलणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारामतीकरांचे सख्खे शेजारी आणि पवार कुटुंबियांचे कट्टर विरोधक असलेले, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी काँग्रेसचा हात सोडला आणि भाजपात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. 


काँग्रेस पक्षात झालेल्या अन्यायाचा पाढा वाचताना इंदापूरचा विकास करण्याची अपेक्षा हर्षवर्धन यांनी यावेळी व्यक्त केली. तर मुख्यमंत्र्यांनीही त्यांचं कौतुक करताना इंदापूरचा विकास करण्याची ग्वाही दिली.



लोकसभा निवडणुकीच्या वेळी बारामतीत बिटियाँ गिरनी चाहिए, असा आदेश पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी दिला होता. त्यानुसार सुप्रिया सुळे यांचा पाडाव करण्यासाठी भाजपानं शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यात भाजपाला अपयश आलं. 


हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशाच्या सोहळ्यात चंद्रकांत पाटलांनी ती खंत पुन्हा एकदा बोलून दाखवली. लोकसभा निवडणुकीआधी हर्षवर्धन भाजपात आले असते, तर बारामती देखील जिंकली असती, असं ते म्हणाले.


बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी यानिमित्तानं भाजपाला टोला लगावलाय. शिवाय हर्षवर्धन यांच्या भाजपा प्रवेशाबद्दल आश्चर्यही व्यक्त केलंय.


हर्षवर्धन पाटील यांना पक्षात घेऊन भाजपानं केवळ इंदापूर नव्हे, तर बारामतीचा संग्राम जिंकण्याची मोर्चेबांधणी केलीय. आता त्यात कितपत यश मिळतं, हे येत्या ऑक्टोबरमध्येच कळेल.