मुंबई : पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता हिचा विवाह, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दिवंगत चिरंजीव बिंदुमाधव ठाकरे यांचा मुलगा निहार याच्यासोबत होणार आहे. यामुळे हा लग्नसोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवाराचा घरचा लग्नसोहळा आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबईतल्या घरी जावून भेट घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरुवातीला ही भेट राजकीय असल्याचं वाटत होतं. पण आपण मुलीच्या लग्नाचं आमंत्रण आणि लग्नपत्रिका देण्यासाठी राज ठाकरे यांना भेटायला आलो होतो, असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.


झी २४ तासने यापूर्वीच, १८ नोव्हेंबर २०२१ रोजी बातमी दिली होती, ''पुणे जिल्ह्यातील दिग्गज नेत्याची लेक होणार ठाकरेंची सून !'', अखेर या बातमीवर शिक्कामोर्तब झाला आहे. 



अंकिता पाटील आणि निहार ठाकरे


विशेष म्हणजे राजकीय संबंधातून हे लग्न जमलेलं नाही, तर अंकिता आणि निहार हे परदेशात शिक्षण घेत असताना त्यांची ओळख झाली होती, पुढे त्यांच्यात चांगली मैत्री झाली. 


आता मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाल्यानंतर अंकिता पाटील आणि निहार ठाकरे यांचं शुभमंगल पार पडणार आहे. या लग्नाला दोन्ही बाजूंच्या आप्तेष्टांनी होकार दिला आहे.



अंकिता पाटील या काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत, तर हर्षवर्धन पाटील हे मूळचे काँग्रेस नेते म्हणून ओळखले जात असले, तरी ते सध्या भाजपात आहेत.