मुंबई : मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. या पार्श्वभुमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यानावे एक ऑडीओ क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. या कथित क्लीपमधील आवाजानुसार, लॉकडाऊन पुन्हा लावावा लागेल, दंड करा अशा सूचना ऐकू येत आहेत. प्रत्येक व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये हा संदेश एव्हाना पोहोचला आहे. दरम्यान आरोग्यमंत्र्यांनी ट्वीट करुन यावर स्पष्टीकरण दिले आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत सध्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप माझ्या नावाने व्हायरल होत आहे. मात्र त्या क्लिपमधील आवाज माझा नाही असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन म्हटलंय.



काय आहे क्लीपमध्ये ? 


सर्व मंगल कार्यालयांना नोटीस द्या. जर तिथे विना मास्कचे आणि जास्त संख्येने कोणी आढळले तर त्यांना दंड लावा. पुन्हा सापडले तर गुन्हे दाखल करा आणि मंगल कार्यालय १५ दिवसांसाठी सील करा. कोचिंग क्लासेसवर जाऊन रेड करा. त्यांना नोटीस द्या. मास्क लावले का पाहा. पुन्हा सापडले तर कोचिंग क्लासेस सील करावे लागतील. हे तात्काळ करायचे आहे. काही डॉक्टरचं म्हणणं आहे की हा नवा स्ट्रेन आहे. हिंगोली, परभणी, औरंगाबादमध्ये काही कारवाई होत नसल्याचं कळतंय. 


अनेकजण खासगी डॉक्टर्सकडे जात आहेत आणि डॉक्टर त्यांना टेस्ट करायला सांगत नाहीत. जर लक्षण असतील तर त्या रुग्णाला कोरोना चाचणी करण्यास पाठवायला हवं. 


भाजी मंडया, दुकानदारांच्या पुन्हा चाचणी सुरु करा. त्या घरच्यांना तपासा. रुग्ण बाहेर फिरणार नाहीत याची काळजी घ्या. 


लोक विना मास्क फिरले तर त्यांना दंड केला जाईल आणि कोरोना प्रसारण केले म्हणून दंड केला जाईल. अशी परिस्थिती लागली तर लॉकडाऊन लावावा लागेल. सीसीटीव्ही बंद झाले असतील तर आढावा घ्या. व्हेंटीलेटर सुरु आहेत का ? याचा आढावा घ्या. 


या ऑडीओ क्लीपमधील आवाज माझा नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तरी कोरोनाचे सावट अद्याप संपलेले नाही. राज्यातील शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढताना दिसतेय. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळळे, मास्क वापरणे, हात धुणे ही काळजी आपण घ्यायलाच हवी.