मुंबई : भारतीय हवामान खात्याने दुपारी १.०० वाजता दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील ४ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, अलिबाग, डहाणू व भोवतालच्या परिसरात अतिवृष्टी होणार आहे.  त्याच बरोबर पुढील ४८ तासात उत्तर मध्य महाराष्ट्र व उत्तर कोकणासाठी अतिवृष्टीचा हवामान खात्याने इशारा दिलेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सद्यस्थितीत सुरु असलेल्या पावसाचा प्रतिकूल परिणाम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर झालेला आहे.  मंत्रालयातील व दक्षिण मुंबईतील शासकीय कार्यालयातील बहुतांश अधिकारी कर्मचारी पश्चिम रेल्वे, मध्य व हार्बर रेल्वे  तसेच बसद्वारे प्रवास करत आहेत.  


भारतीय हवामान खात्याने दिलेला इशारा तसेच सद्यस्थितीत सुरु असलेल्या पावसामुळे  उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करून मंत्रालयातील व बृहन्मुंबईतील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना आज दुपारी २.३० वाजता कार्यालया सोडण्यास अनुमती देण्यात आली


.


दरम्यान, पावसामुळे गणपती बाप्पाच्या विसर्जनात विघ्न आले आहे. पाऊस आणि भरतीमुळे घराबाहेर  कसं पडायचे गणेश भक्तांसमोर प्रश्न आहे. सर्व चौपाटींवर बीएमसी कर्मचारी तैनात कऱण्यात आले आहेत. २०० कर्मचारी चौपाटीवर कार्यरत आहेत.  गणेश भक्ता्नी पालिका अधिकृत कर्मचाऱ्यांकडूनच विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अद्याप एकही गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आलेले नाही.


दरम्यान, मुसळधार पाऊस कोसळत असल्याने वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतूक सेवेवर झालाय. रेल्वेचा वेग मंदवलाय तर विमान सेवा बंद आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल झालेत. शहरात सर्वत्र पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने पाण्यातून रस्ता शोधण्याची वेळ वाहनधारकांवर आलेय. रुळावर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक अत्यंत धीम्यागतीने सुरु आहे.


जोरदार पावसामुळे नेहमी धावणाऱ्या मुंबईचा वेग आज मंदावलेला दिसत आहे. पावसामुळे अनेक कार्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. तर शाळांना सुटी जाहीर करण्यात आलेय. तसेच काही कर्मचाऱ्यांना लवकर घरी सोडण्यात आले आहे. 


पावसाने आज सकाळपासूनच मुंबईला झोडपण्यास सुरुवात केली आहे. मुसळधार पावसाने मुंबई आणि उपनगराला जोरदार झोडपले आहे. जोरदार पावसामुळे लालबाग, हिंदमाता, परळ भागात पाणी साचलं असून रस्त्यांना अक्षरक्ष: नद्यांचे स्वरुप आले आहे. गेल्या २४ तासात १५२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, बांद्रा, दादर भागात पाणी साचले आहे.


दरम्यान, कसारा येथे रुळावरील माती बाजुला करताना डोक्यात ओव्हरहेड वायर पडल्याने रेल्वेचे सहा कंत्राटी कामगार जखमी झालेत. ही घटना रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सीएसटी ते टिटवाळा आणि कसारा ते आसनगाव लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे. काही लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही अन्य मार्गे वळवल्या आहेत. रेल्वे सेवा पूर्ववत होण्यास उद्याची सकाळ उजाडेल, असे सांगण्यात येत आहे.