दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारने 15 ते 30 तारखेदरम्यान अत्यंत कडक निर्बंध घोषित केले आहेत. त्यामुळे छोट्या व्यवसायिकांना आर्थिक फटका बसतोय. त्यामुळे राज्यातील  शेतकरी, सलून चालक, फुल विक्रेत, मुंबईचे डबेवाले आणि छोट्या व्यावसायिकांना आर्थिक मदत देण्याची मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सरकारने काही घटकांसाठी पॅकेज जाहीर केले आहे. परंतु त्यात शेतकरी, सलून दुकानदार, फुल विक्रेते, टॅक्सी चालक, मासळी विक्रेते, मुंबईतील डबेवाले व छोटे व्यावसायिकांचा सामावेश करण्यात आला नाही. 


कोरोनावर मात करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत हे घटक मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहेत. त्यांच्यासाठी पॅकेजमध्ये तरतूद करून या घटकांनाही उचित  न्याय द्यावा. अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.


संचारबंदीच्या कालावधीत भाजीपाला, फळबागायती व फुलांच्या शेती व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे. या कालावधीत मार्केटमध्ये मालाचा उठाव मोठया प्रमाणावर होत नाही, परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार तसेच सलूनचे दुकान बंद असल्याने या व्यावसायिकांचेही मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.


या कालावधीत सर्व धार्मिक स्थळांवर बंदी असल्याने फुल विक्रेत्यांवरही उपासमारीची वेळ येणार आहे. मुंबईतील महत्वाचा घटक असलेल्या डबेवाल्यांचाही या पॅकेजमध्ये समावेश करून या घटकांना लाभ द्यावा, असे पटोले यांनी पत्रात म्हटले आहे.