मुंबईतील वायू प्रदुषण पाहून तुम्हीही व्हाल थक्क; `फुफ्फुसांचा` रंगही बदलला
दिल्लीमध्ये अवघ्या सहा दिवसात ही फुफ्फुसे काळ्या रंगात परिवर्तित झाली.
मुंबई: जानेवारी महिन्याच्या सुरुवातीस वांद्रे पश्चिम येथे वायू प्रदूषण- जागरूकता मोहीम राबविण्यात आली. त्याचाच भाग म्हणून याठिकाणी विशाल HEPA - filter lungs बसविण्यात आले होते. हे फिल्टर्स मानवी शरीरातील फुफ्फुसांप्रमाणे काम करतात. दोन आठवड्यांपूर्वी लावण्यात आलेली ही फुफ्फुसे शुभ्र पांढऱ्या रंगापासून काळ्या रंगाची झाली आहेत. आरोग्य तज्ज्ञांनी ही बाब अतिशय गंभीर असल्याचे सांगितले. त्यामुळे मुंबईतील वायू प्रदुषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
२०१८ मध्ये अशाचप्रकारची फुफ्फुसे दिल्ली आणि बंगळुरू येथे लावण्यात आली होती. दिल्लीमध्ये अवघ्या सहा दिवसात ही फुफ्फुसे काळ्या रंगात परिवर्तित झाली. तर बंगळुरूत २५ दिवसांमध्ये या फुफ्फुसांचा रंग काळा झाला होता.
वांद्य्रातील आर.डी. नॅशनल कॉलेज जंक्शनबाहेर १४ जानेवारीला ही फुप्फुसे स्थापित करण्यात आली होती. दुसऱ्या दिवसापासूनच ह्या फुफ्फुसांचा रंग झपाट्याने बदलू लागला. ' The Billboard that breathes' असे नाव असलेला हा उपक्रम महाराष्ट्रात पहिल्यांदाच राबविण्यात आला. या उपक्रमातंर्गत वायू प्रदूषणाचा आरोग्यावर होणारा घातक परिणाम दाखवण्याचा प्रयत्न आहे.
या उपक्रमाविषयी माहिती देताना लीलावती रुग्णालयाचे मुख्य पल्मोनोलॉजिस्ट डॉ. संजीव मेहता यांनी सांगितले की, आपण लोकांना Low Air Qwality Index (AQI) किंवा पार्टिक्युलेट मॅटर पातळीबद्दल सांगायला गेलो तर ते ऐकणार नाहीत. मात्र, या काळ्या फुफ्फुसांचे दृश्य ते कधीही विसरणार नाहीत. यामुळे लोकांमध्ये वायू प्रदूषणाबद्दल जागरुकता निर्माण होईल, असे डॉ. मेहता यांनी सांगितले.