मुंबई: येत्या तीन महिन्यांत मुंबईतील गर्दीच्या स्थानकांवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता भारतीय गुप्तचर यंत्रणांनी वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यासाठी स्थानकांवरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा, संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा, लांबपल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेसमध्ये अधिक खबरदारी बाळगा, असे आदेश रेल्वे प्रशासनाकडून संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. तसेच रेल्वेकडून प्रवाशांनाही खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेवारस वस्तू अथवा संशयित बॅग दिसल्यास त्याची माहिती तातडीने आरपीएफ अथवा जीआरपी कर्मचाऱ्यांना द्यावी, प्रवाशांनी अफवा पसरवू नयेत तसेच पोलिसांच्या तपासणीला सहकार्य करणे आवश्यक असल्याची माहिती रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत शिरण्याचा प्रयत्न करु शकतात. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायगडमधल्या आपटा वस्तीच्या बसमध्ये बॉम्ब


पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशाच्या इतर भागांमध्येही घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न दहशतवादी संघटना करू शकतात, असा संशय गुप्तचर विभागाला आहे. रायगडच्या आपटा येथे बुधवारी रात्री एका एसटी बसमध्ये बॉम्ब सापडला होता. कर्जतहून आलेली एसटी आपटा बस डेपोमध्ये थांबली असताना कंडक्टरला पिशवीत बॉम्बसदृश्य वस्तू दिसली. त्याने माहिती देताच रसायनी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बॉम्बशोधक पथकाला या घटनेची माहिती दिली. यानंतर बॉम्बशोधक पथकाकडून हा बॉम्ब निकामी करण्यात आला. यावेळी आपटा गावातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. यावेळी लहानसा स्फोटही झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तत्पूर्वी कानपूर-भिवानी कालिंदी एक्स्प्रेसमधील प्रसाधनगृहातही कमी तीव्रतेचा स्फोट झाला होता. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि इतर यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत.