अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई : मुंबईत थर्टीफर्स्ट सेलिब्रेशन मोठ्या जल्लोषात केलं जातं. मात्र, याचा फायदा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंमली पदार्थ तस्कर, मद्य तस्कर यांचा सुळसुळाट झालेला असतो. आपल्याकडील विष तरूणांपर्यंत पोहोचवून कोट्यवधी रूपये कमावण्यासाठी हे अंमली पदार्थ तस्कर नामी शक्कल लढवतात... कोडवर्ड वापरतात... या कोड वर्डवर मुंबई पोलीसही लक्ष ठेऊन आहेत. दुसरीकडे बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांची अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यापासून कारवाया १२ पटींनी वाढल्या आहेत. 


थर्टी फर्स्टचं प्लॅनिंग सुरू असेल पण लक्षात ठेवा तुमचा गैरफायदा ड्रग तस्कर घेऊ शकतात. या काळात तरूणांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी ड्रग तस्कर स्वतःजवळचं विष विकत असतात. त्यासाठी त्यांनी कोडवर्डही वापरलेत. कोकेन, हशीष, चरस, एसएसडी डॉट्स, एक्स्टसी, मेफेड्रॉन आणि एन बॉम्ब हे अंमली पदार्थ दरवर्षी वेगवेगळ्या नावाने बाजारात विकले जातात. यावर्षी चर्चेत असलेल्या सेलिब्रिटी कपलची नावं त्याला देण्यात आली आहेत. 


फास्ट अँड फ्युरियस म्हणजे कोकेन


फास्ट अँड फ्युरियस या हॉलिवूडपटाने जगभर तरूणांना वेड लावलं होतं. त्याचं नाव कोकेला यावेळी देण्यात आलंय


किंग्जमन द गोल्डन सर्कल म्हणजे चरस


हा चित्रपट म्हणजे सिक्रेट सुपर हिरोंचं सिक्रेट मिशन... कोकेनप्रमाणेच चरस हे देखील एक महागडं आणि सिक्रेट ड्रग्ज म्हणून त्यालाही हे नाव देण्यात आलंय.


थोर रॅगनॉर्क म्हणजे एमडी ड्रग


सर्वात स्वस्त अशी ओळख असलेलं एमडी ड्रग. ड्रग सेवन करणारा हिंसक होतो. त्यामुळे या ड्रगला हे नाव देण्यात आलंय.


कॉन्जुरिंग म्हणजे एलएसडी डॉट्स


काँजुरिंग भयपटात सेकंदा सेकंदाला थरकाप उडतो. त्याप्रमाणे एसएसडी डॉट्स घेतल्याने अनुभव येतो म्हणून त्याला हे नाव देण्यात आलंय.


जस्टीस लीग


जस्टीस लीग हे हायप्रोफाईल ड्रग. वाळवंटात सुई मिळावी त्याप्रमाणे हे ड्रग समजलं जातं. म्हणून या ड्रगला सुपरहिट जस्टीस लीग सिनेमाचं नाव दिलंय. 


तर याच ड्रग्सना काही अंमली पदार्थ तस्करांनी वोडका, विस्की, रम, जीन आणि टकीला असे कोडवर्डही दिलेत. पोलीस मात्र या तस्करांवर करडी नजर ठेवून आहेत. अंमली पदार्थांच्या या काळ्या धंद्यांवर घाव घालण्याकरता मुंबई पोलीसांनी देखील कंबर कसलीये. विशेष पथका मार्फत मुंबई पोलीस या तस्करांच्या मुसक्या आवळतायत. 


२०१७ या वर्षभरात अंमली पदार्थ तस्करी विरोधी पथकाने ड्रग्स बाळगणे आणि विकणे प्रकरणी ६६ गुन्हे दाखल केले. यात १३४ आरोपींना अटक करण्यात आली. तर अटक आरोपींकडून ४२३ किलो ८४८ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. मुंबईकरांनो सावधान, तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी हे ड्रग तस्कर विविध युक्त्या शोधत आहेत. ड्रग्ज घेऊ नका आणि कोणालाही घेऊ देऊ नका...