गृहमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया
स्वच्छ प्रशासन देण्याचा प्रयत्न करणार
मुंबई : स्वच्छ प्रशासन देण्याचा माझा प्रयत्न राहिलं. प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप माझ्या बाजूने राहणार नाही असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Homeminister Dilip Walase Patil) यांनी स्पष्ट केले. गृहमंत्रीपदाचा चार्ज घेतल्यावर पहिल्यांदाच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पोलीस बदल्यांबाबत जी सिस्टीम आहे त्यानुसार होईल. शक्ती कायदा, पोलीस भरती गतीमान करणे, पोलीस घरांचा विषय या माझ्या प्राथमिकता असेल असेही ते म्हणाले.
सध्या अवघड, आणि आव्हानात्मक काळ आहे. कोरोनामुळे पोलीस दल रस्त्यावर आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबर, कोरोनाचं आव्हान पोलीसांसमोर आहे. तसेच या महिन्यात विविध धर्मियांचे सण आहेत. कोरोनाचा अंदाज पाहिला तर या महिन्यात आणखी आव्हानात्मक परिस्थिती असणार आहे. गृह विभागाकडून सर्वसामान्य नागरीक, महिला यांना अपेक्षा असतात. सर्वसामान्य माझे केंद्रबिंदू असतील. तसेच पोलीस दलाचे सक्षमीकरण करणे ही महत्त्वाची बाब असल्याचे गृहमंत्री म्हणाले.
अनिल देशमुख यांच्याबाबत देखील त्यांना प्रश्न विचारण्यात आले. काल हायकोर्टाने जो निर्णय दिलाय. त्यात एनआयबी चौकशी करतंय सीबीआयचा आदेश दिलाय. तपास यंत्रणांना सहकार्य केले जाईल. हायकोर्टाचा आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाणार असल्याचे ते म्हणाले.
राज्यातील पोलीस दल एकत्रित काम करतंय असं चित्र दिसायला हवं यासाठी आमचे प्रयत्न आहेत. महाराष्ट्राला पारदर्शक कारभार देणार असल्याचेही ते म्हणाले.
यापूर्वी भाजपच्या अनेक मंत्र्यांवर आरोप होते, त्यामुळे कोण काय आरोप करतंय याकडे मी लक्ष देणार नाही. कोणाच्या काय निष्ठा आहे याबाबत माहिती घेऊन जे आवश्यक वाटेल निर्णय घेऊ. मी माहिती घेईन, जिथे जिथे दुरुस्ती करणं आवश्यक आहे तिथे करणार असल्याचे वळसे पाटील म्हणाले.
यावेळी वळसे पाटील यांनी शरद पवार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जयंत पाटील यांचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणे झाले असून भेटायचे असल्याचेही ते म्हणाले.