सगळेच विरोध असताना भाजप जिंकूच कशी शकते?- उद्धव ठाकरे
निवडणुकीआधी तोंड फाटेपर्यंत आश्वासने द्यायची व सत्तेवर येताच त्यापासून पळ काढायचा.
मुंबई: शेतकऱ्यांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत सगळेच विरोधात असताना भाजपला निवडणुकांमध्ये विजय कसा मिळू शकतो, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री लोकप्रिय आहेत म्हणूनच ते एकापाठोपाठ एक अशा निवडणुका जिंकत आहेत. राज्यात इतका असंतोष असतानाही भाजपच जिंकते, असे या मंडळींचे म्हणणे आहे, पण राज्यातशेतकऱ्यांपासून सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत सगळेच विरोधात असताना हे लोक जिंकतात कसे? हासुद्धा शंकेचा विषय आहे, अशी भूमिका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'त मांडण्यात आली आहे.
मात्र, शेतकरी किंवा सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे, हे निवडणुका जिंकण्याइतके सोपे नाही. प्रश्न सोडविण्यासाठी सरकारकडून समित्या नेमल्या जातात. हा एक वेळकाढूपणाचा प्रयोग आहे व असा टाइमपास देशात आणि महाराष्ट्रात चार वर्षे सुरू आहे. निवडणुकीआधी तोंड फाटेपर्यंत आश्वासने द्यायची व सत्तेवर येताच त्यापासून पळ काढायचा, हीच भाजपची कार्यपद्धती असल्याची टीका सेनेने केली आहे.
तुम्हाला लोकांनीच सत्तेवर आणले. त्यांनीच आता उद्रेक केला आहे. हेच लोकप्रियतेचे लक्षण आहे काय? प्रजा पोटापाण्यासाठी संपावर आहे. राजा म्हणतो, मी लोकप्रिय आहे, असा टोलाही या अग्रलेखातून भाजपला लगावण्यात आला आहे.