TATA Sumo : उद्योगपती रतन टाटा यांच्या टाटा मोटर्सनं (Tata Moters) भारतात प्रवासी वाहनांमध्ये क्रांती घडवून आणली. रेल्वेचं इंजिनं बनवण्यापासून सुरु झालेला प्रवास, ट्रक आणि प्रवासी वाहनं बनवण्यापर्यंत सुरु राहिला. या टप्प्यात प्रवासी वाहनांमध्ये 'टाटा सुमो' हा महत्वाचा पल्ला ठरला. दणकट आणि एकाच वेळी 10 प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या टाटा सुमोनं एक काळ बाजारावर अधिराज्य गाजवलं. टाटा मोटर्सनं जापनिज सुमोंच्या नावावरुन या गाडीचं नाव सुमो  (TATA SUMO) ठेवलं असावं असा अनेकांना वाटत असावं... पण हा गैरसमज आहे.... हे नाव एका मराठमोळ्या इंजिनिअरचं आहे.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी माणसाचा सन्मान
टाटा मोटर्सनं सुमंत मुळगावकर यांच्या नावावरुन मीडसाईज एसयुव्हीला सुमो असं नाव ठेवलं. सुमंत या नावातील पहिले दोन शब्द आणि मुळगावकर या आडनावातील दोन शब्दांनी सुमो हा शब्द बनला.  सुमंत मूळगावकर यांनी टेल्को आणि टाटा मोटर्सच्या उभारणीत दिलेल्या योगदानासाठी टाटांनी एका वाहनालाच त्यांचं नाव देऊन त्यांचा सन्मान केला.


कोण आहेत सुमंत मूळगावकर 
सुमंत मूळगावकर यांचा जन्म मुंबईत झाला. इम्पिरियल कॉलेज ऑफ लंडनमधून त्यांचं शिक्षण झालं. तेव्हाच्या एसीसी सिमेंटमध्ये त्यांनी सुरुवातीला नोकरी केली. 1949 मध्ये सुमंत मूळगावकर टेल्कोमध्ये प्रभारी संचालक म्हणून रुजू झाले. 1954 मध्ये टाटाच्या ट्रक निर्मिती प्रकल्पात महत्वाचा सहभाग होता. 1966 मध्ये टेल्को प्रकल्पाची उभारणी केली. 


सुमंत मूळगावकर यांनी टाटाच्या ट्रकमध्ये अनेक सुधारणा केल्या. टाटाची वाहनं ग्राहकांच्या पसंतीला कशी उतरतील यासाठी अनेक प्रयत्न केले. सुमंत मूळगावकर यांचा 1 जुलै 1989 रोजी मृत्यू झाला. पण त्यांचं योगदान टाटा समूह विसरला नव्हता. त्यांच्या मृत्यूनंतर टाटा समुहानं लाँच केलेल्या वाहनाला सुमो असं नाव दिलं. एका कर्मचाऱ्यानं केलेल्या कामाचं केलेलं कौतुक करण्याचा दिलदारपणा फक्त रतन टाटांसारख्या व्यक्तीतच असू शकतो.  कर्मचाऱ्यांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या रतन टाटांचं हेच वेगळेपण होतं.