मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ होत आहे. राज्यात एका दिवसात नवे २ हजार९४० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता मुंबईतील ऑटो टॅक्सीवर प्रशासनाने बंदी घातली आहे.  अशात आपत्कालीन परिस्थिती ओढावली तर मुंबईकर या संकटाचा सामना कशा प्रकारे करतील? असा प्रश्न आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उपस्थित केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत प्रत्येक क्षणी कायदा बनविला जातो आणि दुसऱ्या सेकंदात दुसरा बदलला जातो. महाराष्ट्र शासनाने कोरोना अंतर्गत जारी केलेल्या आदेशात ऑटो आणि टॅक्सीवर बंदी घातली आहे. ऑटो टॅक्सीवर बंदी, मग आपत्कालीन परिस्थितीत मुंबईकर प्रवास कसा करतील? हा प्रश्न आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उपस्थित केला आहे.


शिवाय मुंबईची लाईफ लाईन अर्थात रेल्वे, मेट्रो पूर्णपणे बंद आहेत. बेस्ट बसमध्ये सामान्य लोकांवर निर्बंध असतात. आज प्रत्येक नागरिकांकडे खासगी गाड्या नसतात असे सांगत अनिल गलगली म्हणाले की, जर एखाद्याला रुग्णालयात जायचे असेल तर सामान्य नागरिकांना कोणते पर्याय उपलब्ध आहेत? आपत्कालीन परिस्थितीत सामान्यांना प्रवास करण्यासाठी सरकारने आतापर्यंत कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही.


त्यामुळे राज्य सरकारने ऑटो टॅक्सीवर बंदी मागे घ्यावी. या संदर्भात गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्य सचिव अजय मेहता आणि परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांना पत्र लिहिले आहे.