मुंबई :  राज्यपालांनी 6 आमदारांची नावं सुचवलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं. त्यामुळे एकच खबळबळ उडाली. पण हे पत्र बनावट असल्याचा खुलासा राजभवनकडून करण्यात आला आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना आमदारांच्या नावांची शिफारस केल्याचं पत्र बनावट असल्याचं समोर आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजभवनानं 'झी 24 तास'ला याबाबत माहिती दिलीय. 12 आमदारांच्या नियुक्त्यांबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या 6 नावांची शिफारस केल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. हे पत्र सप्टेंबर 2020 सालचं असल्याचं या पत्रात लिहिण्यात आलं आहे.


दरम्यान, हे पत्र बनावट असेल तर त्याचीही चौकशी होणं गरजेचं आहे, राज्यपाल भवनातून अशा पद्धतीने बनावट पत्र जातात का?, असा प्रश्नही या निमित्ताने समोर आला आहे.  हे पत्र आलं कुठून, कोणी आणलं आणि कोणत्या व्यक्तीने आणलं याचा तपास होण्याची गरज आहे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.


पत्रावर राज्यपाल भवनाची सही आहे, थप्पा आहे, त्यामुळे राजभवनाबाहेर राज्यपालांच्या नावाने काही खेळी खेळल्या जात आहेत का? त्या पद्धतीच्या काही गडबडी होत आहेत का, कोणाला आमदार बनवण्याचा प्रयत्न सुरु आहे का? या सर्व गोष्टींची चौकशी व्हायला हवी, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 


पत्रावरचा शिक्का आणि सही तपासून त्यात आर्थिक घोटाळे आहेत का, याचं स्पष्टीकरण समोर आलं पाहिजे, असंही नाना पटोले यांनी म्हटलं. 


12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रस्ताव तयार करुन गेल्या दोन वर्षांपासून त्याची प्रतीक्षा सुरु आहे. पण आता हे बनावट पत्र बाहेर येत असेल तर त्याची गांभीर्याने चौकशी होणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.