मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सोमवारी मुंबईत (Mumbai) येऊन मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC Election) रणशिंग फुंकलं आहे. मुंबईत येऊन अमित शाह यांनी थेट शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना खुलं आव्हान दिलं आहे. भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजप महापालिका निवडणुकीत 150 जागा जिंकणार असा निर्धार व्यक्त केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र आता हा एवढा मोठा आकडा भाजप (BJP)  गाठणार कसा याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. या निवडणुकीत शिंदे गटला  (Eknath Shinde) बरोबर घेऊन भाजप निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर मनसेला (MNS) सोबत घेण्याबाबात अमित शाह यांनी कोणतेही भाष्य केलेलं नाही. कारण मनसेला सोबत घेतल्यास उत्तर भारतीयांची मतांवर परिणाम होण्याची भीती भाजपला आहे.


मात्र निवडणुकीपूर्वी भाजपने मनसेशी युती केली नाही तरी नंतर मात्र ते एकत्र येऊ शकतात. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी यापूर्वीही भाजप 135चा आकडा गाठणार असा दावा केला होता. तर सोमवारी अमित शाह मुंबई दौऱ्यावर असतानाही भाजप 150 जागा जिंकणार अशी गर्जना त्यांनी केली आहे.


याचाच अर्थ भाजपचा स्वबळावर अगदी शिंदे गटाचीही गरज न भासता मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्याचा मानस आहे. आता भाजप हा आकडा कसा गाठणार याच्याच विविध फॉर्म्युल्यांची चर्चा सध्या सुरु आहे. 


असा असेल भाजपचा 150 जागांचा फॉम्युला


यातील पहिला फॉर्म्युला म्हणजे गेल्या निवडणुकीत 82 भाजपचे नगरसेवक निवडून आले होते. यामध्ये वाढ होण्याची शक्यता भाजपमधील तज्ञ व्यक्त करत आहेत. हा आकडा जरी 90 पर्यंत गेला तरी 60 जागाचं काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकांची मते मिळवलेल्या 30  नगरसेवकांना भाजप निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे. तर इतर 30 जागांवर स्वबळावर निवडून येणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल. मात्र हे सारं ढोबळ असं समीकरण आहे. कारण अजून निवडणुकांसाठी वेळ असल्याने समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. ज्यामुळे हे गणितही किंवा हा फॉम्युलाही बदलू शकतो. 


अद्याप ठाकरे गटातील नगरसेवक फुटले नसले तरी तिकीट वाटपामध्ये नाराजी या सारख्या कारणांमुळे काहीजण भविष्यात भाजपाच्या गोटात जाऊ शकतात. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तर त्याचाही एकप्रकारे भाजपाला फायदा होऊ शकतो. कुंपवणार असलेले माजी नगरसेवक उद्धव ठाकरे गटातील असंतुष्ट नगरसेवक तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी आणि इतर पक्षांती असंतुष्ट नगरसेवकांना हेरून त्यांना भाजपात खेचण्याचा प्रयत्न करुन हा आकडा गाठण्याचा मेगा प्लॅन केला जाण्याची शक्यता आहे. 


दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबई महापालिकेच्या सत्तेवरुन खेचून बाहेर काढण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपचा हा मेगा प्लॅन यशस्वी झाला तर मुंबईत एक इतिहास घडेल. विशेष म्हणजे अमित शाह यांनी वापरलेला 150 जागांचा आकडा हा केवळ आणि केवळ भाजपचा आहे. त्यामुळेच शिंदे गट किंवा मनसेला सोबत न घेता  स्वबळावर मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी भाजपने तयारी सुरु केली आहे.