Wife Beat Husband: लग्नाचा वाढदिवस विसरल्याने सासू आणि नवऱ्याला मारहाण
husband beaten by wife: मुंबईमधील घाटकोपरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणामध्ये पत्नीबरोबरच तिचे आई-वडील आणि भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai Crime News: मुंबईमधील घाटकोपरमध्ये (Ghatkopar) एक थक्क करणारा प्रकार समोर आला आहे. येथील एका 27 वर्षीय महिलेने आपल्याच पतीला भावाच्या मदतीने मारहाण केली (husband beaten by wife) आहे. आश्चर्याची बाब म्हणजे केवळ लग्नाचा वाढदिवस (marriage anniversary) लक्षात राहिला नाही म्हणून भाऊ आणि आई-वडिलांच्या मदतीने या महिलेने पतीला मारहाण केली. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार ही घटना 18 फेब्रुवारी रोजी घडली असून या प्रकरणात एकूण 4 आरोपी असल्याचं पोलिसांनी निश्चित केलं आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पती लग्नाचा वाढदिवस विसरल्याने ही महिला चांगलीच संतापली. तिने आपल्या माहेरी फोन करुन आई-वडील आणि भावाला बोलावून घेतलं. या महिलेचे नातेवाईक घरी पोहोचल्यानंतर त्यांनी आपल्या जावयला मारहाण केली. त्याच्या वाहनाचेही नुकसान केलं.
32 वर्षीय नवरा वाहनचालक
घाटकोपर पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ निरीक्षक संजय डहाके यांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या चौघांना नोटीस पाठवली आहे. कायदेशीर प्रक्रियेनंतर या चौघांविरोधात कारवाई केली जाईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित नवऱ्याचं नावं विशाल नांगरे असं आहे. 32 वर्षीय विशाल एका कुरियर कंपनीमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतो. तर त्याची पत्नी कल्पना एका फूड आऊटलेटमध्ये काम करते. दोघांचं लग्न 2018 मध्ये झालं आहे.
नेमकं घडलं काय?
विशाल आणि कल्पना गोवंडीला राहतात. मात्र नवऱ्याला वाढदिवस लक्षात राहिला नाही ही तक्रार घेऊन कल्पना घाटकोपरला तिच्या सासूच्या घरी आली. या ठिकाणी कल्पना आणि विशालच्या आईचं जोरदार भांडण झालं. या भांडणानंतर कल्पनाने तिच्या आई-वडिलांना आणि भावाला सासूच्या घरी बोलावून घेतलं. रात्री 9.30 च्या सुमारास दोन्ही बाजूकडून जोरदार बाचबाची झाली. संतापलेल्या कल्पनाने आपल्या सासूच्या कानशीलात वाजवली. त्यानंतर कल्पनाच्या नातेवाईकांनी विशालला मारहाण केली. सध्या विशाल आणि त्याच्या आईला राजावाडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. मेडिकल रिपोर्टनंतर त्यांनी घाटकोपर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. विशालने या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे.
पत्नीचा भाऊ त्याला चावला
एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पत्नीचा भाऊ विशालच्या चेहऱ्याचा आणि हाताचा चावा घेतला आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी भारतीय दंड संहितेमधील कलम 323, 324, 327, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत.