मुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ताला कायदेशीर हिसका दाखवण्याची भाषा केल्यानंतर आता तनुश्रीनेही आपण या लढाईसाठी तयार असल्याचे सांगितले आहे. सध्याची परिस्थिती पाहता माझ्या वकिलांची फौजही कायदेशीर लढाई लढायला तयार आहे. नाना पाटेकर यांच्या वकिलाने दोन दिवसांपूर्वी मला नोटीस पाठवल्याचा दावा केला होता. मात्र, हे सपशेल खोटे आहे. त्यामुळे आता ब्लफमास्टरने खरोखर मैदानात उतरले पाहिजे, असे आव्हान तनुश्रीने दिले. 


याशिवाय, तनुश्री दत्ताने कारवाईचा धाक दाखवणाऱ्या नाना पाटेकर यांच्या वकिलांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे. एखाद्या गुन्हेगाराचा बचाव करणाऱ्या वकिलाला जाब विचारला गेला पाहिजे. कायद्याच्या नावाने पीडितांना आणि साक्षीदारांना त्रासा देणाऱ्या वकिलांवर बार असोसिएशनने कारवाई केली पाहिजे, अशी मागणी तनुश्रीने केली.