भाजप खासदार पूनम महाजन यांचा धक्कादायक खुलासा...
उत्तर मुंबईच्या भाजप खासदार आणि दिवंगत प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन यांनी एक धक्कादायक खुलासा केलाय. यानिमित्तानं महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय.
मुंबई : उत्तर मुंबईच्या भाजप खासदार आणि दिवंगत प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन यांनी एक धक्कादायक खुलासा केलाय. यानिमित्तानं महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय.
लैंगिक शोषण
इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांशीत संवाद साधताना आपणही एकेकाळी लैंगिक शोषणाचा बळी ठरल्याचं पूनम महाजन यांनी म्हटलंय.
क्लाससाठी वरळीहून वर्सोवापर्यंत दररोज जाण्या-येण्यासाठी पैसे नसायचे म्हणून आपण रेल्वेतून हा प्रवास करत असल्याचं पूनम महाजन यांनी म्हटलंय. त्यावेळी अनेकांच्या वाईट नजरांचा सामना करावा लागल्याचं त्यांनी म्हटलं.
कुणी चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला तर स्वत:ला बिचारं समजू नका... जर कुणी तुमच्याकडे वाईट नजरेनं पाहत असेल तर अशा परिस्थितीचा सामना करण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थीनींना दिलाय. त्या संस्थेत 'ब्रेकिंग द ग्लास सीलिंग' या विषयावर बोलत होत्या.
भारताची स्थिती अमेरिकेपेक्षा चांगली
महिलांच्या यशस्वीतेचा इतिहास अमेरिकेपेक्षा भारताचाच चांगला असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलंय. अमेरिकेत अद्याप कोणतीही महिला राष्ट्रपती झालेली नाही, आपल्याकडे मात्र महिला राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि मुख्यमंत्री या महत्त्वाच्या पदांवर आरुढ झालेल्या दिसल्याचंही त्यांनी म्हटलंय.
पूनम महाजन या भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्ष आहेत. तसंच भारतीय बास्केटबॉल महासंघाच्या अध्यक्ष बनणाऱ्या त्या पहिला महिला आहेत. वडील प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर त्या भाजपमध्ये सहभागी झाल्या होत्या. २०१४ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांना पछाडत उत्तर-मध्य मुंबईतून खासदार म्हणून संसदेत प्रवेश मिळवलाय.