मुंबई : आज राज्यात फिरताना तरुणांचा पाठिंबा मिळत आहे, हे खरे आहे. असे असले तरी महाराष्ट्रात तरुणांच्या नवीन नेतृत्वाची फळी करायची आहे. त्यांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे. पुढील दहा ते वीस वर्षांत युवा तरुणांची फळी तयार करायची आहे. त्यांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे. त्यामुळे नवीन नेतृत्व उभे करण्यासाठी कामाला लागलो आहे. त्यादृष्टीने मी पाऊल उचलले आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'झी २४ तास'ला खास मुलाखतीत दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'झी २४ तास'चे कार्यकारी संपादक आशिष जाधव यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी राष्ट्रवादीची 'शिवस्वराज्य यात्रा' यावर भाष्य करताना ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसने लोकांशी संवाद साधण्यासाठी 'शिवस्वराज्य यात्रा' काढली. खासदार अमोल कोल्हे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढण्यात आली.


'तरुणांच्या हाती नेतृत्व हवे'


तरुणांच्या हाती नेतृत्व आले पाहिजे. त्यांना वाव मिळाला पाहिजे. त्याची आज गरज आहे. त्यादृष्टीने माझा विचार सुरु आहे. त्यासाठीच युवा नेतृत्वाची फळी उभी करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने काम सुरु आहे, असे सांगताना त्यांनी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे उदाहरण दिले. १९६५-६६ मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी एका भाषणात सांगितले होते की, पुढील वीस वर्षांत मला तरुणांची पिढी कार्यरत करायची आहे. त्यामुळे सभेत जी पुढे तरुण पिढी बसली आहे. त्यांना पुढे घेऊन जायचे आहे. त्यांनी तरुणांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे मला तरुणपणी संधी मिळाली. आता तिच जबाबदारी माझ्यावर आहे. राज्यात तरुण पिढीला पुढे आणायचे आहे. त्यांचे नेतृत्व उभे करायचे आहे. त्यामुळे मी हे काम हाती घेतले आहे, असे पवार म्हणालेत.


पुढील वारस कोण?


दरम्यान, दुसऱ्या एका प्रश्नावर पवार म्हणालेत, रोहित किंवा पार्थ पवार यांच्यातला जो कर्तृत्ववान असेल तो पुढे जाईल. या मुलाखतीत पवारांचा राजकीय वारसदार कोण असेल, असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. यावर पवारांनी आपला कोणालाही पाठिंबा नाही, असे सांगितलं. जो कर्तृत्ववान असेल तो पुढे जाईल असेही पवारांनी सांगितले.


तरुणांच्या हाताला काम नाही!


यावेळी पवार यांनी मनमोकळे भाष्य केले. 'ईडी'ची चौकशी, पवार घराण्यातील गृहकलह ते निवडणुकीची स्थिती आदी विषयांवर खुलेपणाने भाष्य केले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लोक बदलाच्या विचारात आहेत. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून सत्ता, संपत्ती आणि साधनांचा प्रचंड गैरवापर सुरु आहे. परंतु, महाराष्ट्रातील जनतेला नक्कीच बदल हवा आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी बालाकोट हल्ला आणि घुसून मारु, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाष्य, यावर तरुणांना आकर्षण वाटले. त्यामुळे तरुण त्यांच्याकडे वळला. त्यामुळे मोठ्याप्रमाणात मतदान झाले. आता तशी परिस्थिती पाहिलेली नाही. आज बेरोजगारी वाढली आहे. अनेक तरुणांच्या हाताला काम नाही. अनेकांची नोकरी गेली आहे. अनेक उद्योगधंदे बंद पडले आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे, हे चिंताजनक आहे. तसेच शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही. त्यामुळे शेतकरी संकटात आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. 


'आमच्या घरात गृहकलह नाही'


दरम्यान, यावेळी शरद पवार यांनी आमच्या घरात कोणताही कलह नसल्याचेही स्पष्ट केले. मी आज घरात मोठा आहे. त्यामुळे सगळे माझे ऐकतात. अजितला मी सांगितल्यानंतर तो राज्यात जोराने प्रचार करीत आहे. पक्षाचे काम करीत आहे, असे पवार म्हणालेत.  'ईडी'ने माझ्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे अजित पवार उद्विग्न झाले होते. याच मनस्थितीत त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यासाठी कोणताही गृहकलह कारणीभूत नाही. पवार घराणे हे एका मताने वागणारे आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.