`मीच पुन्हा मुख्यमंत्री होणार`
`मी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री`
मुंबई : मीच मुख्यमंत्री होणार, मी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेवर येण्याचा निर्धार व्यक्त केला. ही निवडणूक युतीच्या माध्यमातूनच लढणार, याबद्दल शंका बाळगू नका, हे सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला जोरदार टोला हाणला आहे. आपल्या मित्रपक्षामध्ये बऱ्याच लोकांना बोलायची खुमखुमी आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. पुढची पाच वर्षं दुष्काळमुक्ती हेच ध्येय असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कुठलाही संभ्रम मनामध्ये ठेऊ नका, आपण ही निवडणूक युतीमध्येत लढणार आहे, ही निवडणूक आपण युतीतच लढणार आहोत, असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
युतीमध्ये लढत असताना कोणत्या जागा आपल्या आणि कोणत्या जागा मित्रांच्या याचा निर्णय लवकरच होणार, असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुकांच्या तयारीसाठी राज्यातील भाजपा नेत्यांना कार्यान्वित करण्यासाठी भाजपाच्या विस्तारीत प्रदेश कार्यकिरणीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीसाठी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, एकनाथ खडसे यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी बैठकीसाठी उपस्थित लावली होती.
मात्र निमंत्रण पत्रिकेत नाव असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या बैठकीला अनुपस्थित होते. गडकरींसह सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडेही या कार्यकारिणीसाठी अनुपस्थित होत्या. गडकरी कार्यकारिणीच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आले आहे.