मुंबई :  कोरोना संकटात मुंबईतील महापालिका रुग्णालयातील गलथानपणावर टीका वाढत असताना या रुग्णालयातील व्यवस्थापन सुधारण्यासाठी अखेर आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती सरकारने केली आहे. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी मुंबई महापालिकेची तीन प्रमुख रुग्णालये असलेल्या नायर, केईएम आणि लोकमान्य टिळक, सायन रुग्णालयात तीन आयएएस अधिकारी नियुक्त केले आहेत. त्यानुसार नायर रुग्णालयाची जबाबदारी मदन नागरगोजे, केईएम रुग्णालयाची जबाबदारी अजित पाटील यांच्याकडे आणि सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयासाठी बालाजी मंजुळे यांच्याकडे देण्यात आली आहे. या तीनही अधिकाऱ्यांना आज महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी बैठक घेऊन मार्गदर्शन केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय मुंबईतील जी. टी. रुग्णालय आणि जे. जे. रुग्णालय या राज्य सरकारच्या अखत्यारितील रुग्णालयांची जबाबदारी शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव सुशील खोडवेकर यांच्याकडे सोपवली आहे. या सर्व अधिकाऱ्यांना त्यांचं राज्य शासनातील काम संभाळून रुग्णालयातील व्यवस्थापनाचे काम करावे लागणार आहे.



दिवसेदिवस मुंबईतील कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. महापालिकेच्या रुग्णालयांवर आणि एकूणच आरोग्य व्यवस्थेवर त्याचा मोठा ताण आला आहे. त्यामुळे सायन आणि केईएम रुग्णालयासह अन्य रुग्णालयात गलथानपणाच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. अनेक ठिकाणी कोविड तसेच नॉन कोविड रुग्णांना खाटा उपलब्ध नसल्याच्याही तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर महापालिका रुग्णालयांचं व्यवस्थापन आता आयएएस अधिकाऱ्यांच्या हातात सोपवण्यात आलं आहे.