COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई : यंदा ऊन जरा जास्तच आहे....  उन्हाळ्यात गारेगार आईस्क्रीम, बर्फाचा गोळा, आईसकॅण्डी खाल्ली की घशालाही आणि मनालाही बरं वाटतं. तसं प्राण्यांनाही वाटत असेल.... म्हणूनच राणीच्या बागेतल्या प्राण्यांसाठी गारेगार आईस फ्रुट केक तयार केले जातायत. कलिंगड, केळी, काकडी, चिकु, पेरू अशी वेगवेगळी फळं कापली जातात. ती गुळाच्या पाण्यात घातली जातात आणि नंतर रेफ्रिजरेटरमध्ये थंड करुन हा आईस फ्रुट केक प्राण्यांना खायला दिला जातो. उनाचा दाह कमी करण्यासाठी गुळ खाणं चांगलं असतं. म्हणूनच इथल्या डॉक्टरांनी अशी आईस फ्रूट आणि गूळ कँडी प्राण्यांना द्यायला सुरुवात केली.


शाकाहारी प्राण्यांसाठी गुळाच्या पाण्यात ठेवण्यात आलेला आईस फ्रुट केक दिला जातो. तर मांसाहारी प्राण्यांसाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिनच्या पाण्यात मांसाचे तुकडे टाकून नॉनव्हेज आईस फ्रुट केक दिला जातो. 


पिंजऱ्यात राहणाऱ्या प्राण्यांचा थोडा व्यायाम व्हावा म्हणून छोट्या खोक्यांमध्ये फणस, भुईमुगाच्या शेंगा आणि फळं लपवून ठेवली जातात. ते शोधून काढण्यात या प्राण्यांचा थोडा व्यायामही होतो आणि बॉक्समधलं हे सरप्राईजही मिळतं. आईस फ्रुट कँडी खाणारे हे प्राणी बघण्यात पर्यटकांनाही मजा येतेय. आता पावसाचे वेध लागलेत. पण वातावरण अजूनही प्रचंड उष्ण आहे, आर्द्रताही प्रचंड वाढलीय. अशा वातावरणात प्राण्यांनाही या आईस फ्रूट कॅण्डीचे दोन घास थंडावा देतायत.