हीच परिस्थिती राहिली तर देशातील जनता झारखंडचा कित्ता गिरवेल- पवार
दिल्लीतील सभेत मोदींनी केलेले वक्तव्य ऐकून मला आश्चर्य वाटले.
मुंबई: झारखंडच्या जनतेने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला, हे अभिनंदनीय आहे. देशात अशीच परिस्थिती राहिली तर संधी मिळेल तेव्हा देशातील जनताही झारखंडप्रमाणेच निर्णय घेईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ते मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, भाजपने सत्ता आणि संपत्तीचा वापर करून झारखंड हातात ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आदिवासीबहुल लोकसंख्या असणाऱ्या झारखंडने तसे होऊन दिले नाही. यासाठी मी झारखंडच्या जनतेचे अभिनंदन करतो, असे शरद पवार यांनी सांगितले.
केंद्र सरकारने देशाचे अर्थकारण योग्यरित्या हाताळले नाही. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आली. परिणामी देशातील मंदी वाढत आहे. या सगळ्याची किंमत सामान्य नागरिकांना मोजावी लागत आहे. झारखंडमधील जनतेने यावर नापसंती व्यक्त केल्याचेही पवारांनी यावेळी सांगितले.
यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रीय नागरिक नोंदणीविषयी (एनआरसी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुटप्पी भूमिकेवरही बोट ठेवले. काल दिल्लीतील सभेत मोदींनी केलेले वक्तव्य ऐकून मला आश्चर्य वाटले. ते म्हणाले आम्ही एनआरसीविषयी केंद्रीय मंत्रिमंडळ आणि संसदेत चर्चा केलेली नाही. मात्र, राज्यसभेतील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टपणे देशभरात एनआरसी लागू करणार असे सांगितले होते. त्यावेळी मी स्वत: आणि प्रुफल्ल पटेल राज्यसभेत उपस्थित होतो. त्यापूर्वी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेवेळीही गृहमंत्र्यांनी हीच भूमिका मांडली होती. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या भूमिकेतील विरोधाभास दिसून येत आहे. या सगळ्यामुळे देशात कारण नसतानाही अस्वस्थता निर्माण झाली आहे. हे चित्र असंच राहिलं तर लोक संधी मिळेल तेव्हा झारखंडच्या पद्धतीने निर्णय घेतील, असे पवार यांनी सांगितले.