मुंबई: वेळ पडल्यास आम्ही आवश्यक बहुमताची जुळवाजुळव करू सरकार स्थापन करू, असा इशारा देणाऱ्या शिवसेनेविरोधात भाजपने रामबाण अस्त्र उपसले आहे. शिवसेना आणि भाजपमधील सत्तावाटपाच्या रस्सीखेचीमुळे निकालाला सात दिवस उलटूनही राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. मात्र, येत्या ८ तारखेपर्यंत राज्यात सरकार स्थापन झाले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल, असा निर्वाणीचा इशारा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. ते शुक्रवारी 'झी २४ तास'शी बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'शिवसेना दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करु शकते'


यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले की, शिवसेना भाजपमधील पेच सुटला पाहिजे. 'मी बांधेन ते तोरण, मीच करेन ते धोरण', असा पवित्रा घेऊन चालणार नाही. शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे निवडणूक लढवली आहे. जनतेच्या हितासाठी दोन्ही पक्षांना चर्चेतून मार्ग काढावा लागेल. अन्यथा राष्ट्रपतींना हस्तक्षेप करावा लागेल. ८ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन झाले नाही तर घटनेच्या तरतुदीनुसार राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यामुळे आता शिवसेना माघार घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यानंतर अमित शहा यांची मुंबई भेट रद्द?


तत्पूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईतील पत्रकारपरिषदेत भाजपला एकट्याने सत्तास्थापन करण्याचे धाडस करू नका, अन्यथा फजिती होईल, असा इशाराही दिला. लोकसभा निवडणुकीच्यावेळी शिवसेना आणि भाजप यांच्यात झालेली चर्चा संपूर्ण देशाने पाहिली होती. विधानसभा निवडणुकीत जनतेनेही शिवसेना आणि भाजप यांना एकत्रितपणे कौल दिला आहे. जनतेचा हा कौल मानण्यास भाजप नकार देत असेल तर उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणताही पर्याय उरणार नाही. तशी वेळ आल्यास शिवसेना दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करु शकते, असा दावा यावेळी राऊत यांनी केला.