मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा मोदी सरकार सत्तेत आले तरी ते फारकाळ टिकणार नाही, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वर्तवले आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी पवार यांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रपतींनी भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले तरी या सरकारची अवस्था १९९६ सालच्या वाजपेयी सरकारप्रमाणे होईल. त्यामुळे नवं मोदी सरकार फारतर १३ ते १५ दिवस टिकेल, असा ठाम विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. तसेच राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम वेगात सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. 


लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार पडले असून येत्या १९ तारखेला अंतिम टप्प्याचे मतदान होईल. यानंतर २३ तारखेला मतदानाचा निकाल जाहीर होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी भाजप पुन्हा सत्तेत येईल, असा दावा केला जात असला तरी पक्षाकडून अन्य पातळ्यांवर पर्यायांची चाचपणी सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपचे सरचिटणीस राम माधव यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत भाजपला यंदा सत्तास्थापनेसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) मित्रपक्षांची गरज पडेल, असे त्यांनी म्हटले होते. तसेच उत्तर भारतात भाजपला २०१४ च्या तुलनेत फटका बसेल, हे मान्य केले. मात्र, ईशान्य भारत, ओदिशा आणि पश्चिम बंगालमधून त्याची भरपाई होईल, असेही त्यांनी सांगितले होते. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही लोकसभा निवडणुकीनंतर देशात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल, असा अंदाज वर्तवला होता.