गरज भासली तर मध्यस्थतेसाठी तयार - नितीन गडकरी
भाजपच्या काही मंत्र्यांनी गडकरींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली
मुंबई : गरज भासल्यास युतीचा तिढा सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मध्यस्थी करणार असल्याची माहिती सूत्रांनी 'झी २४ तास'ला दिलीय. तसंच अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचं काही ठरलेलं आपल्या माहितीत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच राज्यात सरकार बनेल असं गडकरी म्हणालेत. बाळासाहेबांच्या काळातही ज्यांचे आमदार अधिक त्यांचा मुख्यमंत्री असं धोरण ठरलं होतं असं गडकरी म्हणालेत. दरम्यान भाजपच्या काही मंत्र्यांनी गडकरींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यात विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख आणि संभाजी निलंगेकर यांचा समावेश आहे. गडकरी एका कार्यक्रमासाठी मुंबईत आले असून सर्वांनाच महायुतीचं सरकार हवं असल्याचं बावनकुळेंनी सांगितलंय.
महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी भाजपा आणि शिवसेने दरम्यान सुरु असलेल्या पडद्याआडच्या डावपेचा दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मध्यस्थतेची तयारी दर्शवली आहे. 'गरज भासली तर मी मध्यस्थतेसाठी तयार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार बनेल. मला जेवढं ठावूक आहे त्यानुसार, महाराष्ट्रात शिवसेनेसोबत अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याबद्दल कोणतीही चर्चा झाली नव्हती, अशीही पुश्ती नितीन गडकरी यांनी जोडलीय. याआधीही, ज्यांचे जास्त आमदार असतील त्यांचाच मुख्यमंत्रीही असेल अशी बाळासाहेब ठाकरे यांचीही भूमिका राहिलीय, असंही त्यांनी पुढे म्हटलंय.
गुरुवारी नागपूरमध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यासोबत एकाच मंचावर उपस्थित राहिल्यानंतर आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबईत दाखल झालेत. वरळीच्या आपल्या घरीच ते थांबलेत. सायंकाळी गडकरी नवी मुंबईच्या घनसोली भागात एका खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झालेत.
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री विनोद तावडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानावर दाखल झाले. महाराष्ट्रात महायुतीचंच सरकार स्थापन होईल, आम्ही काँग्रेस किंवा राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात महायुतीचंच सरकार बनेल पण केव्हा बनणार त्यासाठी मात्र वाट पाहावी लागेल, असंही त्यांनी म्हटलं.