...तर लोया प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरु करणार- नवाब मलिक
लोया प्रकरणात कुणीही तक्रार घेऊन आला आणि त्यामध्ये तथ्य आढळले तर सरकार त्याची निश्चितपणे पुन्हा चौकशी सुरु करेल.
मुंबई: न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरणी काही ठोस माहिती पुढे आली तर या प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरु करण्यात येईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी केले. महाविकासआघाडी सरकारकडून हा निर्णय प्रत्यक्षात अंमलात आणला गेल्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अडचणीत येऊ शकतात.
आज मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. यानंतर नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोया प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरु करण्याचे संकेत दिले. काही दिवसांपूर्वीच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गरज पडल्यास लोया प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरु करु, असे म्हटले होते. याविषयी विचारले असता नवाब मलिक यांनी म्हटले की, लोया प्रकरणात कुणीही तक्रार घेऊन आला आणि त्यामध्ये तथ्य आढळले तर सरकार त्याची निश्चितपणे पुन्हा चौकशी सुरु करेल. विनाकारण या प्रकरणाची चौकशी केली जाणार नाही. शरद पवार यांनी यापूर्वीच प्रसारमाध्यमांशी बोलताना ही बाब स्पष्ट केली होती, याकडे नवाब मलिक यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
गेल्या काही काळात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात विरोधी पक्षातील अनेक नेत्यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी झाली होती. राज्य सहकार बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी ईडी शरद पवार यांचीही चौकशी करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, शरद पवार यांच्या आक्रमक भूमिकेनंतर 'ईडी'ने तुर्तास चौकशीची गरज नसल्याचे म्हटले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही कोहिनूर स्क्वेअर प्रकरणात 'ईडी'ने कसून चौकशी केली होती. भाजपच्या या 'ईडी' अस्त्रामुळे विरोधी पक्षातील अनेक नेते गर्भगळीत झाले होेते. त्यामुळे आता शरद पवारांनी भाजपला शह देण्यासाठी थेट अमित शहा यांच्याविरोधातच चौकशी सुरु करण्याच्या हालचाली सुरु केल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
कोण होते जस्टिस लोया?
न्यायमूर्ती ब्रिजगोपाल लोया हे गुजरातमधल्या सोहराबुद्दीन बनावट एन्काऊन्टर प्रकरणात CBI कोर्टाचे न्यायाधीश होते. याच खटल्यात भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावरही आरोप असल्याने हा खटला राजकीयदृष्ट्याही संवेदनशील झाला होता. नागपूरमध्ये एका लग्नसोहळ्याला गेलेले असताना लोया यांचा १ डिसेंबर २०१४ मध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. लोया यांच्या मृत्यूनंतर सोहराबुद्दीन एन्काऊन्टर खटल्यातून अमित शाह यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.