मुंबई: नारायण राणे आणि त्यांचे कुटुंबीय भाजपामध्ये आल्यास त्यांचे स्वागतच असेल, असे संकेत भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि आमदार प्रसाद लाड यांनी दिले आहेत. तसेच प्रसाद लाड यांनी ते रत्नागिरीतून लढण्यास उत्सुक असल्याचेही सांगितले. त्यासाठी सध्या रत्नागिरी आणि चिपळूण विधानसभा मतदार संघातून उमेदवारीसाठी चाचपणी सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभेसाठी सेना-भाजप युती अभेद्य आहे. पण युती तुटली तर रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून आपण निवडणूक लढण्याची तयारी करत असल्याचे लाड यांनी स्पष्ट केले. 
 
गेल्या काही काळामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात तशी बोलणीही झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा जागावाटपाच्या मुद्द्यावरून ऐनवेळी युती तुटते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 


काही दिवसांपूर्वी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण संकेतही दिले होते. गेल्या निवडणुकांचा निकाल लक्षात घेता भाजपचे १२२ आमदार, अपक्षांचे समर्थन आणि इतर पक्षांमधून आलेले आमदार यांचा विचार करता आज भाजपचे संख्याबळ हे १३२ आमदारांचे आहे. त्यामुळे १३५ जागांवर समाधान मानणे भाजपसाठी अशक्य आहे. मुख्य म्हणजे याची जाणीव शिवसेनेलासुद्धा आहे. त्यामुळे जुना फॉर्म्युला यंदा शक्य नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. 
 
 राणा जगजिंतसिंह पाटील यांचा भाजपप्रवेश जवळपास निश्चित


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राणा जगजितसिंह पाटील यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलीय. आज राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल होणार आहे. मात्र, यावेळी राणा जगजितसिंह पाटील अनुपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. 


राणा जगजितसिंह पाटील हे शरद पवार यांचे नातेवाईक पदमसिंह पाटील यांचे पूत्र आहेत. पदमसिंह पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राणा जगजितसिंह पाटील हे भाजपाच्या संपर्कात असून पूरपरिस्थितीमुळेच त्यांचा पक्षप्रवेश लांबल्याची चर्चा सुरू आहे.