कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : राज्याच्या राजकारणात आता 'गरज सरो आणि युती मरो' अशी एक नवी म्हण प्रचलित होतेय. लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीसाठी शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढणारी भाजप आता मात्र शिवसेनेला भावही देत नाही. अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यातून हेच तर चित्र पहायला मिळाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी थेट मातोश्री गाठणारे आणि त्यानंतर वरळीतील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेसाठी उद्धव, आदित्य यांच्यासोबत एकाच गाडीतून जाणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा...आणि आता विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबई दौ-यावर आलेले अमित शहा...


या सात महिन्यांच्या काळात युतीच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यावेळी घेतलेल्या आणाभाका शिवसेना वारंवार लक्षात आणून देत आहे, परंतु भाजप मात्र त्याविषयी चक्कार शब्दही काढत नाही. नाशिक इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर राम मंदिरच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला. तर उद्धव ठाकरे यांनीही भाजपची दुखती नस असणारा राम मंदिर मुद्यासाठी पुन्हा अयोध्येला जाणार असल्याचे पिलू सोडून दिले.


लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाने एक पाऊल मागे घेत शिवसेनेशी युती केली होती. नाणार इथला प्रकल्प रद्द करण्याच्या अटीसह शिवसेनेच्या अनेक अटी भाजपने मान्य केल्या होत्या. आता भाजप १६५ आणि सेना १०५ असा विधानसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला भाजपाने शिवसेनेसमोर ठेवला आहे. शिवसेनेला हा फॉर्म्युला मान्य नाही, शिवसेना समसमान जागा वाटपाच्या मुद्द्यावर ठाम आहे.


भाजपची राज्यात ताकद वाढल्याने भाजपचे वरिष्ठ नेते शिवसेनेला अनुलेख्खाने मारत आहेत. नाशिकमध्ये पंतप्रधानांनीही नाही आणि मुंबईत अमित शहांनीही शिवसेनेचे नाव घेतले. युतीबाबत तर काहीच बोलले नाही. 


नाही म्हणायला अमित शहांनी एनडीएचे नाव घेतले असले तरी त्यात शिवसेना असेलच असे नाही. प्रचारात ३७० कलम हटवण्याचे श्रेय घेण्यात एनडीएचा घटक पक्ष म्हणून सेनाही आग्रही असली तरी अमित शहा मातोश्रीकडे फिरकले नसल्याबद्दल सेना नेत्यांकडे उत्तर नाही. 


युती झाल्यास भाजपपेक्षा मोठा फायदा सेनेला होणार आहे. तर युती न झाल्यास भाजपपेक्षा सेनेचे नुकसान अधिक होणार आहे.


युतीची सर्वाधिक गरज ही शिवसेनेला असल्याने सेनेनेच एक पाऊल मागे घ्यायला हवे असे भाजपाला अपेक्षित आहे. तरच युती होण्याची दाट शक्यता आहे.